Shirur News : वन्यजीव संरक्षणासाठी सजग असलेल्या शिरूर वन विभागाने उदमांजर व मऊ पाठीचे कासव यांच्या शिकारीप्रकरणी धडक कारवाई करत आरोपीस अटक केली असून या कारवाईत वनअधिकाऱ्यांचे विशेष कौतुक होत आहे. दि. २२ फेब्रुवारी २०२६ रोजी शिरूर वनपरिक्षेत्र कार्यालयास मिळालेल्या माहितीनुसार, काही इसम वन्यप्राण्यांची शिकार करून फरार होत असल्याचे समजले. यानुसार वनपरिक्षेत्र अधिकारी व त्यांच्या पथकाने तात्काळ धाड टाकत आरोपी लक्ष्मण सखाराम पवार (वय ३९, रा. दुधाडेवाडी घोटावडे, जि. रायगड) यास ताब्यात घेतले. धाडीत आरोपीकडून मेलेले उदमांजर व मऊ पाठीचे कासव तसेच शिकारीचे साहित्य जप्त करण्यात आले. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ अंतर्गत कलम ९, ३९ व ५१ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून या गुन्ह्यात इतर आरोपींचा सहभाग आहे का याचा शोध सुरू आहे. दि. २३ फेब्रुवारी रोजी आरोपीस प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालय, शिरूर येथे हजर केले असता न्यायालयाने त्याला दोन दिवसांची वनकोठडी सुनावली. संबंधित वन्यप्राणी अनुसूची-१ मध्ये समाविष्ट असल्याने त्यांची शिकार करणे हा गंभीर, दखलपात्र व अजामिनपात्र गुन्हा आहे. दोषी आढळल्यास सात वर्षांपर्यंत कारावास व दंडाची तरतूद आहे. ही कारवाई अशिष ठाकरे वनसंरक्षक, वनवृत्त पुणे,प्रशांत खाडे उपवनसंरक्षक, वनविभाग जुन्नर यांच्या मार्गदर्शनाखाली स्मिता राजहंस सहाय्यक वनसंरक्षक जुन्नर, निळकंठ गव्हाणे वनपरिक्षेत्र अधिकारी शिरूर, गौरी हिंगणे वनपाल, शिक्रापूर, प्रमोद पाटील वनरक्षक, सोपान अनासुने वनरक्षक, नारायण राठोड वनरक्षक, गणेश झिरपे वनरक्षक, जालिंदर सानप, वनरक्षक करण्यात आली. वनपरिक्षेत्र कार्यालय, शिरूर येथील इतर कर्मचारी यांच्या संयुक्त कारवाईमुळे वन्यजीव शिकारींवर मोठा धाक निर्माण झाला असून वन विभागाने नागरिकांना आवाहन केले आहे की अशा प्रकारच्या गुन्ह्यांची माहिती त्वरित द्यावी. वन्यजीवांचे संरक्षण ही समाजाची सामूहिक जबाबदारी असून अशा गुन्ह्यांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचे विभागाने स्पष्ट केले. हेही वाचा : Pune Accident News :कात्रज घाटात भीषण अपघात! सळ्यांनी भरलेल्या ट्रकची बसला धडक; चालकाचा मृत्यू