पुणे | दहावीच्या गुणपडताळणीसाठी दि. ११ जूनपर्यंत करा अर्ज

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. मूल्यांकनाविषयी काही समस्या असतील तर विद्यार्थ्यांकडून गुणपडताळणी, उत्तरपत्रिकांच्या छायांकित प्रती, पुनर्मूल्यांकन यासाठी २८ मे ते ११ जून या कालावधीत ऑनलाइन अर्ज स्वीकारण्यात येणार आहेत.
दहावीच्या परीक्षेत मिळालेल्या गुणांसंदर्भात विद्यार्थ्यांना काही तफावत किंवा शंका वाटत असेल तर त्यांना ऑनलाइन पद्धतीने शुल्कासह अर्ज करणे आवश्यक आहे.
मार्च २०२४ च्या परीक्षेतील विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकांच्या छायाप्रती मागवण्यासाठी ई-मेलद्वारे, संकेतस्थळावरुन, हस्तपोहोच, रजिस्टर पोस्टाने यापैकी एका पर्यायाची निवड करता येईल व त्यांनी मागणी केलेल्या पध्द्तीने छायाप्रत उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी http://verification.mh-ssc.ac.in या संकेतस्थळावर सर्व माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत.
परीक्षेतील उत्तरपत्रिकांचे पुनर्मूल्यांकन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्याच्या दिवसापासून त्यापुढील पाच कार्यालयीन कामाच्या दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्दतीचा अवलंब करुन विहित नमुन्यात प्रती विषय शुल्क ऑनलाईन पध्दतीने भरुन संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक राहणार आहे.
श्रेणी सुधार साठी प्रविष्ट होण्यास दोन संधी
इयत्ता दहावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना त्यांची संपादणुक सुधारण्यासाठी श्रेणी किंवा गुणसुधार योजनेअंतर्गत फक्त लगतच्या दोनच परीक्षांमध्ये पुन्हा परीक्षेस प्रविष्ट होता येणार आहे.
मार्च २०२४ च्या परीक्षेस प्रविष्ट होवुन सर्व विषयात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना जुलै-अॉगस्ट २०२४ व मार्च २०२५ च्या दहावीच्या परीक्षेस श्रेणी सुधार साठी प्रविष्ट होण्यास दोन संधी देण्यात येत आहे.




