Food Adulteration: ‘अन्न भेसळीच्या राक्षसाला पायदळी तुडवा!’; मंडईतील रांगोळीतून सामाजिक संदेश
Food Adulteration:

Food Adulteration: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीचा उत्साह पाहायला मिळत आहे. ढोल-ताशांचा गजर, गणपती बाप्पाच्या जयघोषाने शहर दुमदुमून गेले असताना पुण्यातील मंडई परिसरात राष्ट्रीय कला अकादमी कडून ही रांगोळी साकारण्यात आली आहे. सध्या या रांगोळीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
‘अन्न भेसळीच्या राक्षसाला पायदळी तुडवा!’ असा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. अन्नपदार्थांमध्ये होणाऱ्या भेसळीविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्याचा प्रयत्न या रांगोळीतून करण्यात आला आहे.
गणेश विसर्जन मिरवणुकीच्या मार्गावर ही रांगोळी साकारण्यात आल्याने बाप्पाच्या दर्शनासाठी आणि मिरवणूक पाहण्यासाठी आलेल्या नागरिकांचे लक्ष त्याकडे जात आहे.
अन्न भेसळ ही नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर समस्या आहे. दूध, दुग्धजन्य पदार्थ, मिठाई, खाद्यतेल, मसाले यांसह विविध अन्नपदार्थांमध्ये भेसळ होण्याच्या घटना वेळोवेळी समोर येतात. त्यामुळे नागरिकांनी अन्नपदार्थ खरेदी करताना त्यांची गुणवत्ता, पॅकिंग, उत्पादनाची तारीख आणि इतर आवश्यक माहिती तपासणे गरजेचे आहे.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव साजरा न करता सामाजिक विषयांवर जनजागृती करण्याचा प्रयत्नही केला जातो. त्याचाच प्रत्यय मंडईतील या रांगोळीमधून येत आहे. भेसळ करणाऱ्या प्रवृत्तीविरोधात जनजागृती आणि सुरक्षित अन्नाबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करणे, हा संदेश या रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला आहे.
गणेश विसर्जनाच्या उत्साहात मंडई परिसरातून देण्यात आलेला हा सामाजिक संदेश नागरिकांचे लक्ष वेधून घेत असून, उत्सवाच्या माध्यमातून सामाजिक भान जपण्याचा प्रयत्न या उपक्रमातून करण्यात आला आहे.





