Hingoli News : हिंगोलीत रेड अलर्ट ठरला खरा; ढगफुटीसदृश पावसाने कयाधू नदीला पूर
कयाधू नदीच्या पुरामुळे आणि पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील (Hingoli News) सोडेगाव, नांदापूर, चिखली, कानेगाव, कसबे धावडा आणि पिंपरी खुर्द या सहा गावांचा हिंगोली शहराशी असलेला थेट संपर्क काही काळासाठी पूर्णपणे तुटला होता.

Hingoli News : हवामान विभागाने दिलेल्या रेड अलर्टच्या इशार्यानंतर हिंगोली जिल्ह्यात (Hingoli News) ३० जुलै रोजी पावसाने थैमान घातले. संपूर्ण हंगामात एका मोठ्या पावसाची वाट पाहणाऱ्या हिंगोलीकर शेतकऱ्यांसाठी गुरुवारी सकाळपासून सुरू झालेली पावसाची संततधार रात्रीच्या वेळी अधिकच भयानक बनली. रात्रभर झालेल्या ढगफुटीसदृश मुसळधार पावसामुळे हिंगोलीतील कयाधू नदीला यंदाच्या हंगामात पहिल्यांदाच मोठा पूर आला आहे.
कयाधू नदीच्या पुरामुळे आणि पुलावरून पाणी वाहू लागल्यामुळे कळमनुरी तालुक्यातील (Hingoli News) सोडेगाव, नांदापूर, चिखली, कानेगाव, कसबे धावडा आणि पिंपरी खुर्द या सहा गावांचा हिंगोली शहराशी असलेला थेट संपर्क काही काळासाठी पूर्णपणे तुटला होता.
अचानक आलेल्या या पुरामुळे जिल्ह्यातील रस्ते वाहतूक ठप्प झाली असून अनेक भागांतील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. याशिवाय, हजारो एकर शेतजमिनींमध्ये पुराचे पाणी साचल्यामुळे पिकांचे अतोनात नुकसान झाले असून शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडला आहे.
जिल्ह्यात (Hingoli News) गेल्या २४ तासांत सरासरी १०३.९ मिलीमीटर इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पावसाचा सर्वाधिक फटका हिंगोली तालुक्याला बसला असून तेथे सर्वाधिक १४५ मि.मी. पाऊस नोंदवला गेला, तर वसमत तालुक्यात सर्वात कमी म्हणजे ७०.४ मि.मी. पाऊस झाला. १ जूनपासून आजपर्यंतच्या आकडेवारीचा विचार केला असता जिल्ह्यात एकूण ४०८.३ मि.मी. (५१.३ टक्के) सरासरी पाऊस झाला आहे.
तालुकानिहाय २४ तासांतील पाऊस आणि एकूण सरासरी (१ जूनपासून)
हिंगोली तालुक्यात १४५ मि.मी. (एकूण ५०८.२ मि.मी.), कळमनुरी १०४.३ मि.मी. (४५१.२ मि.मी.), औंढा नागनाथ ११०.८ मि.मी. (४०१.७ मि.मी.), सेनगाव ८९.८ मि.मी. (३३५.६ मि.मी.) आणि वसमत तालुक्यात ७०.४ मि.मी. (३३८.४ मि.मी.) पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यातील तब्बल ३० पैकी २७ महसुली मंडळांमध्ये अतिवृष्टी झाली आहे. यामध्ये हिंगोली (७), कळमनुरी (६), औंढा नागनाथ (४) आणि सेनगाव (६) या चारही तालुक्यांतील सर्वच्या सर्व मंडळांत अतिवृष्टी नोंदवली गेली आहे, तर वसमत तालुक्यातील ४ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली आहे.
या गंभीर परिस्थितीची दखल घेत जिल्हा प्रशासनाने (Hingoli News) सर्व आपत्कालीन यंत्रणांना अलर्ट मोडवर राहण्याचे आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच कयाधू नदीकाठच्या व पूरप्रवण क्षेत्रातील नागरिकांनी पूर्ण दक्षता बाळगावी आणि सतर्क राहावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.





