चिंबळीत ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजारोहण; स्वातंत्र्याचा उत्साह

चिंबळी: भारतीय स्वातंत्र्याच्या ७९ व्या वर्धापनदिनाच्या पार्श्वभूमीवर खेड तालुक्यातील चिंबळी (ता. खेड) येथे ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ध्वजपूजन आणि ध्वजारोहणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. देशभक्तीची भावना जोपासण्यासाठी आणि स्वातंत्र्याचा अभिमान जपण्यासाठी शासनाच्या धोरणानुसार आयोजित या कार्यक्रमात ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.
चिंबळी ग्रामपंचायतीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ध्वजपूजन सरपंच ज्योतीताई जैद, ग्रामपंचायत सदस्या राजश्री जैद, ग्रामपंचायत अधिकारी तुषार सांळूखे यांच्या हस्ते करण्यात आले. ध्वजारोहण उपसरपंच राहुल चव्हाण यांनी करून राष्ट्रगीत आणि ध्वजगीत सादर करण्यात आले. यावेळी ध्वजाला अभिवादन करून सलामी देण्यात आली. कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याचवेळी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतही ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला. ह.भ.प. जयवंत मानकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक, शिक्षक, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि संचालक उपस्थित होते. ह.भ.प. जयवंत मानकर यांनी सामाजिक बांधिलकी जपत शालेय विद्यार्थ्यांसाठी खाऊ वाटपासाठी २,००० रुपये रोख स्वरूपात दिले. तसेच, विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देण्यासाठी १५,००० रुपये वार्षिक पारितोषिक जाहीर केले. त्यांच्या या योगदानाबद्दल शाळेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. ‘हर घर तिरंगा’ अभियानाने गावात देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला आहे.




