दिवंगत मैल कामगाराच्या पत्नीच्या हस्ते ध्वजारोहण; मुळशी पंचायत समितीचा अनोखा उपक्रम

पौड – पंचायत समिती मुळशी येथे आज स्वातंत्र्यदिनानिमित्त एकल महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने अनोख्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यानिमित्ताने दिवंगत मैल कामगार (sewage workers) दत्तात्रय ओंबळे यांच्या पत्नी शकुंतला दत्तात्रय ओंबळे यांच्या हस्ते पंचायत समिती मुळशी येथे ध्वजारोहणाचा मान दिला गेला.
जिल्हा परिषद पुणेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आलेल्या या मोहिमेअंतर्गत शकुंतला ओंबळे यांना विशेष मान्यवर म्हणून आमंत्रित करण्यात आले. ध्वजारोहणानंतर राष्ट्रध्वजाला सलामी देण्यात आली, तसेच राष्ट्रगीत आणि राज्यगीत म्हणण्यात आले.
या कार्यक्रमात पंचायत समिती मुळशीतील सर्व अधिकारी आणि कर्मचारी उत्साहाने सहभागी झाले. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व सहकाऱ्यांनी एकजुटीने प्रयत्न केले. गटविकास अधिकारी सुधीर भागवत यांनी सर्व ग्रामपंचायतींना एकल महिलांना सन्मानाने समाजात स्थान मिळावे आणि त्यांच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलावा यासाठी ध्वजवंदनाची संधी देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, आज मुळशी तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींमध्ये एकल महिलांच्या हस्ते ध्वजारोहण पार पडले. हा उपक्रम समाजात सकारात्मक बदल घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकणारा ठरला आहे.





