रतन टाटा यांच्याकडून शिकण्यासारख्या ‘पाच गोष्टी’

Ratan Tata । टाटा समूहाचे माजी अध्यक्ष रतन टाटा हे मोठे उद्योगपती आणि दानशूर व्यक्तिमत्व आहे. त्यांना पद्मविभूषण आणि पद्मभूषण किताबाने सन्मानित करण्यात आलेले आहे. अशा या व्यक्तिमत्वाकडून शिकण्यासारख्या पाच गोष्टी
विश्वास निर्माण करणे सगळ्यात महत्त्वाचे
एका मुलाखतीत रतन टाटा यांनी सांगितले होते, की कोणत्याही उद्योगाचा सगळ्यात महत्त्वाचा पाया असतो तो म्हणजे विश्वास, तुम्ही उद्योगाशी निगडित सर्व घटकांच्या तसेच ग्राहकांच्या मनात विश्वासाची भावना रुजवणे आवश्यक असते. अगदी आपले कर्मचारी, कामगार, गुंतवणूकदार, ग्राहक आणि लोकांमध्ये तुमच्या कंपनी विषयी उद्योगाविषयी विश्वास असणे अतिशय महत्त्वाचे असते.
भावनांवर नियंत्रण ठेवणे
आयुष्यात यश प्राप्त करणे आणि यशस्वी उद्योग व्यवसायाची उभारणी करणे यासाठी व्यक्तीने स्वतःच्या भावनांवर नियंत्रण ठेवण्याला शिकले पाहिजे. त्याचबरोबर अपयशाला कसे सामोरे जायचे याबद्दलही निश्चित मनात धोरण ठेवले पाहिजे. तुम्हाला जर का यशस्वी उद्योग-व्यवसायाची उभारणी करायची असेल तर या वाटेत अनेक समस्या अडचणी आव्हाने येतात.
अपयशही येते. अशावेळी या सगळ्यांना सामोरे जाताना तुम्ही अतिशय शांतपणे आणि भावनांवर नियंत्रण ठेवण्याची भूमिका घेणे आवश्यक असते. उद्योग व्यवसाय उभारताना अनेकदा अपमानाला अपयशाला सामोरे जावे लागते. त्यावेळी अशा अपमान जनक घटना त्या मनाला लावून न घेता प्रेरणा देणाऱ्या घटना म्हणून त्याकडे पाहणे आवश्यक असते.
जोखीम उचलण्याची तयारी
तुमच्या आयुष्यातील ध्येय साध्य करायची असतील आणि स्वतःचे व्यक्तिमत्व प्रस्थापित करायचे असेल तर त्यासाठी कम्फर्ट झोन मधून बाहेर पडून जोखीम घेणे अतिशय आवश्यक असते. तुमच्या आयुष्यातील वैयक्तिक उद्दिष्टे तसेच व्यावसायिक वाढीसाठी देखील जोखीम घेणे अतिशय महत्त्वाचे असते.
टीमवर्कचे महत्व
रतन टाटांचा असा ठाम विश्वास आहे, की कुठल्याही मोठ्या गोष्टीची उभारणी करायची असेल तर त्यासाठी आपल्याकडे एक मोठी टीम आवश्यक असते. कुठलीही एकच व्यक्ती स्वतःच्या ताकदीवर मोठे काम उभे करू शकत नाही, तर त्यासाठी त्या कामाची विभागणी टीम मधील विविध व्यक्तींकडे सोपवणे आवश्यक असते. त्यांच्याकडून काम करून घेण्याची हातोटी नेतृत्वाकडे असावी लागते.
शिकण्याची आणि ऐकून घेण्याची सवय
रतन टाटा म्हणतात, की आपण आयुष्यात सतत शिकण्याची तयारी ठेवली पाहिजे. तुम्ही सतत नव्या गोष्टी शिकत राहिला तरच तुम्ही यशाच्या दिशेने वाटचाल करू शकता. अगदी यश प्राप्त झाले आहे, असे वाटले तरी देखील नवनवीन गोष्टी आणि कौशल्य शिकणे सुरू ठेवणे आवश्यक असते.
त्याखेरीज तुम्हाला आयुष्यात यशस्वी व्हायचे असेल तर लोकांचे म्हणणे बोलणे ऐकून घेणे आवश्यक असते. ऐकण्यापेक्षाही बोलत असणाऱ्या व्यक्तींच्या भावना काय आहेत हे समजावून घेणे महत्त्वाचे ठरते. त्याखेरीज कौतुक आणि टीका अशा गोष्टी सारख्याच मापाने स्वीकारल्या पाहिजेत. त्यातूनच आपल्याला मार्ग दिसत जातो.





