कोरेगाव तालुक्यातील पाच जण तडीपार

सातारा -कोरेगाव तालुक्यात व इतरत्र ठिकाणी गुन्हेगारी कृत्ये करुन जनतेमध्ये भीती निर्माण करणाऱ्या कोरेगाव तालुक्यातील दोन टोळ्यांमधील पाच जणांना दोन वर्षांसाठी जिल्ह्यातून तडीपार करण्याचे आदेश पोलीस अधीक्षक समीर शेख यांनी दिले. नोव्हेंबरपासून आतापर्यंत जिल्ह्यातील 9 उपद्रवी टोळ्यांमधील 24 गुंडांना तडीपार करण्यात आले आहे. भविष्यातही जिल्ह्यामधील सराईत गुन्हेगारांविरुध्द हद्दपारी, मोक्का, एमपीडीए अशा प्रकारच्या कडक कारवाया करण्यात येणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, टोळीप्रमुख अथर्व अजय पवार (वय 19, रा. वसुधा पेट्रोल पंपाजवळ, कोरेगाव), टोळीतील सदस्य तौफिक शब्बीर शेख (वय 20) व नीरज तानाजी बोडरे (वय 19, दोघे रा. केदारेश्वर रोड, कोरेगाव) यांना तडीपार केले आहे. तर दुसऱ्या टोळीतील टोळीप्रमुख युवराज भरत जगदाळे (वय 22) व अथर्व सुशांत जगदाळे (वय 21, दोघेही रा. कुमठे, ता. कोरेगाव) यांनाही तडीपारीचा आदेश बजावला आहे.
या दोन्ही टोळ्यांवर जिल्ह्यामध्ये गर्दी मारामारी करुन दुखापत करणे, कोयत्यासारखे घातक शस्त्र बाळगून दुखापत करणे, अनुसुचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हे दाखल असल्याने कोरेगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक एस. आर. बिराजदार यांनी या टोळ्यांना जिल्ह्यातून तडीपार करण्याबाबतचा प्रस्ताव हद्दपार प्राधिकरण तथा पोलीस अधीक्षकांकडे सादर केलेला होता. या प्रस्तावाची चौकशी उपअधीक्षक (सातारा ग्रामीण कॅंम्प कोरेगाव) यांनी चौकशी केली होती.
या दोन्ही टोळयांबाबत पोलीस अधीक्षक समीर शेख यांच्यासमोर सुनावणी होऊन त्यांच्यावर जिल्ह्यातून दोन वर्षाकरीता हद्दपारीचा आदेश पारीत केला आहे. हद्दपार प्राधिकरणापुढे सरकार पक्षाच्यावतीने अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर, उपनिरीक्षक मधुकर गुरव, पोलीस नाईक प्रमोद सावंत, कॉ. केतन शिंदे, कॉ. अनुराधा सणस यांनी पुरावा सादर केला.





