बिहारमध्ये अंधश्रद्धेचा क्रूर चेहरा; चेटकीण संशयातून पाच जणांना जिवंत जाळले

पाटणा : बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातील तेटगामा गावात एकाच कुटुंबातील पाच जणांना चेटकीण असल्याच्या आरोपाखाली बेदम मारहाण करण्यात आली आणि नंतर त्यांना जिवंत जाळून निर्घृणपणे मारण्यात आले. सर्व आरोपी गावातून पळून गेले आहेत आणि पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
त्याच गावातील रामदेव ओरांव यांच्या मुलाचा तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला होता आणि दुसऱ्या मुलाची प्रकृतीही खालावली होती. त्या कुटुंबातील एका चेटकीणीमुळे हे झाल्याचे गावातील काहींचे म्हणणे होते व या आरोपावरून एकाच कुटुंबातील पाच जणांची जाळून हत्या करण्यात आली.
मृतांची नावे बाबूलाल ओरांव, सीता देवी, मनजीत ओरांव, रानिया देवी आणि तपातो मोसमत अशी सांगण्यात आली आहेत. हे सर्व एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेनंतर परिसरात घबराट पसरली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नकुल कुमार नामक व्यक्तीला अटक केली आहे. नकुलवर लोकांना जिवंत जाळण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप आहे.
मृतांचा एकमेव वारस ललित म्हणाला की, संपूर्ण कुटुंबाला प्रथम जादूटोणा असल्याच्या आरोपाखाली निर्दयी मारहाण करण्यात आली आणि नंतर जिवंत जाळण्यात आले. कसेबसे आम्ही आमचे प्राण वाचवून तिथून पळून गेलो. ललित म्हणाला की, जाळल्यानंतर सर्वांना पाण्यात फेकण्यात आले. घटनेनंतर ललित देखील घाबरला आहे. पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.





