Suraj Chavan | लातूरमध्ये छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये आणि अजित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा राडा झाला. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण यांनी छावा संघटनेच्या विजयकुमार घाडगे यांना केलेल्या मारहाणीचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. या मारहाणीच्या प्रकरणानंतर अनेकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. अखेर या वादावर सूरज चव्हाण यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत जाहीर माफी मागितली आहे. फेसबुकवर केलेल्या पोस्टमध्ये सूरज चव्हाण म्हणाले की, महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण यांच्यासारख्या सुसंस्कृत नेत्याचा वारसा आहे. त्यांचाच आदर्श मानून आमचे नेते अजितदादा पवार काम करतात. अजितदादांच्या नेतृत्वाखाली काम करताना महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला धक्का लागणार नाही याची काळजी आम्ही घेत आलो आहोत. मात्र अलीकडच्या काळात काही घटक आमच्या नेतृत्वावर अत्यंत हीन पातळीवरची टीका करीत आहेत. त्याबद्दल कार्यकर्त्यांच्या मनात संताप होता. Suraj Chavan | छावा संघटना ही अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे त्यामुळे आम्हाला ती बंधुसंघटना वाटते. त्यांनी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांना निवेदन देणे किंवा त्यांच्या अंगावर पत्त्याची पाने भिरकावणे हे आम्ही समजू शकतो. तो त्यांच्या अभिनव आंदोलनाचा प्रकार असू शकतो. परंतु तिथून निघताना संबंधितांनी आमच्या नेत्यांबद्दल अत्यंत घाणेरडे उल्लेख करीत शिवीगाळ केली. ते ऐकून कार्यकर्त्यांकडून उत्स्फूर्तपणे मारहाणीचा प्रकार घडला. अर्थात तो घडायला नको होता. परंतु दुर्दैवाने घडून गेला. त्याबद्दल मी जाहीर दिलगिरी व्यक्त करतो असं त्यांनी सांगितले. Suraj Chavan | ‘मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा’ शेतकऱ्याच्या प्रश्नावर आवाज उठवला म्हणून विजय घाडगे पाटील यांना आम्ही मारहाण केली, अशा बातम्या प्रसारमाध्यमांवर चालू आहेत. मी स्वत: शेतकऱ्याचा मुलगा आहे. कोणी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आवाज उठवला, तर त्याच्या पाठीशी उभे राहणे मी माझं कर्तव्य समजतो. मी लवकरच विजय घाडगे पाटलांची भेट घेऊन त्यांच्या मनातील गैरसमज दूर करेन, असे सूरज चव्हाण यांनी म्हटले. तर या घटनेवर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी ‘जे घडले ते चुकीचे आहे. आम्ही तिथे नसताना ही घटना घडली, कारवाई झाली पाहिजे. मी या घटनेचा निषेध करतो,’ असे म्हंटले आहे. काय आहे प्रकरण? छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील हे खासदार सुनील तटकरे यांना निवेदन देण्यासाठी गेले होते. तिथे त्यांनी पत्ते उधळत कृषिमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते आणि छावा संघटनेचे कार्यकर्ते आमनेसामने आले. त्यावेळी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांनी विजय घाडगे पाटील आणि त्यांच्यासोबतच्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. रविवारी घडलेल्या या प्रकारामुळे लातूरमध्ये बंदची हाक दिली आहे. Suraj Chavan |