वर्षभराच्या प्रेमाचा भयंकर शेवट…! आधी पतीला विष दिलं, नंतर मृतदेह जंगलात नेऊन जाळला, शर्टच्या तुकड्यावरून बिंग फुटले?

Yavatmal News : यवतमाळ येथून एक महाराष्ट्राला हादरवणारी घटना समोर आली आहे. मुख्यध्यापक असलेल्या पत्नीने शिक्षक पतीला विष देऊन ठार मारल्याची घटना घडली आहे. प्रेमविवाह केलेल्या या जोडप्यात लग्नाच्या काही वर्षातच खटके उडू लागले होते.
त्यातूनच मुख्यध्यापिका पत्नीने पतीला विष देऊन ठार मारले. धक्कादायक बाब म्हणजे तिच्याकडे शिकवणीला येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मदतीने तिने पतीचा मृतदेह जंगलात नेऊन जाळला. मात्र काही दिवसांतच शर्टच्या तुकड्यावरून खूनाचा उलगडा झाला असून पोलिसांनी आरोपी पत्नीसह तीन विधी संघर्ष ग्रस्त बालकांना ताब्यात घेतले आहे.
नेमकं प्रकरण काय?
वर्षभरापूर्वी निधी व शंतनू यांचा प्रेमविवाह झाला होता, निधी सनराईज शाळेत मुख्याध्यापक आहे, तर शंतनू त्याच शाळेत शिक्षक होता. लग्नानंतर दोघांमध्ये काही दिवसातच खटके उडायला लागले, त्यात शंतनूला दारूचे व्यसन जडले, त्यामुळे निधीने पतीला ठार मारण्याचे ठरविले.
निधीने शाळेतील अल्पवयीन विद्यार्थ्यांना भावनिकरीत्या जाळ्यात ओढले. मिशन यूपीएससी 2030 या नावाने तिने विद्यार्थ्यांचा व्हाट्सअॅप ग्रुप तयार केला. रोज पहाटे ती मैदानावर विद्यार्थ्यांचा सराव घ्यायची. यातीलच तीन विद्यार्थ्यांची निवड करून निधीने त्यांचा खुनाच्या प्रकरणात वापर केला. अगोदर निधीने पतीला विष दिले त्यात त्याचा मृत्यू झाला.
त्यानंतर तीन विद्यार्थ्यांना पहाटेच सरावासाठी बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यास सांगितले. विद्यार्थ्यांनी दुचाकीवरून मृतदेह चौसाळाच्या जंगलात नेऊन जाळला. दरम्यान, शंतनू रोज जिथे दारू प्यायला जायचा तिथे तो येत नाही म्हणून पोलिसांना तो बेपत्ता असल्याचे समजले आणि या गुंतागुंतीच्या खून प्रकरणाचा उलगडा झाला.
असा झाला हत्येचा उलघडा
यवतमाळच्या चौसाळा जंगलात एका तरुणाचा अर्धवट जळालेला मृतदेह आढळला. याबाबत पोलीस मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी शंतनू देशमूख हा युवक बेपत्ता असल्याचे पोलिसांना समजले. पोलिसांनी तो ज्यांच्यासोबत दारू प्यायचा त्यांचीही चौकशी केली.
शंतनूची पत्नी निधी हिची देखील विचारपूस केली. तिच्या बोलण्यात विपर्यास वाटल्याने पोलिसांनी उलट तपासणी करताच पाच दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खुनी पत्नीचे बिंग फुटले. दरम्यान, पोलिसांनी निधी व तीन अल्पवयीन बालकांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू केला आहे.





