आधी खळबळजनक आरोप आता सारवासारव? बाळासाहेब ठाकरेंच्या निधनाविषयी रामदास कदम उद्धव ठाकरेंना म्हणाले…

Ramdas Kadam : शिंदे सेनेच्या दसरा मेळाव्यातून शिवेसना पक्षप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत अत्यंत गंभीर आरोप माजी मंत्री रामदास कदम यांनी केले आहेत. त्यांच्या या आरोपांमुळे राजकारण चांगलचं तापलं आहे. दसरा मेळाव्यातून रामदास कदम यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. पण आता त्यांनी केलेले खळबळजनक आरोपामुळे शिंदेसेनेला अडचणीत आणल्याची चर्चा होत आहे.
अशातच रामदास कदम यांनी पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेऊन “बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत” असल्याचं सांगितलं आहे. यामुळे बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्यूबाबत गंभीर आरोप करणाऱ्या रामदास कदम यांनी त्यांच्या विधानावर सारवासाव केल्याची चर्चा होत आहे. ऐन मुंबई महापालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर रामदास कदम यांनी बाळासाहेबांच्या पार्थिवाचा मुद्दा काढला. यामुळे शिंदेसेनेचं मोठं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे. या आरोपांमुळे भाजपाला याची झळ बसू शकते, असं बोललं जात आहे.
आता रामदास कदम काय म्हणाले?
“बाळासाहेब ठाकरे माझं दैवत आहेत”. असं म्हणत दिवाळी होती, लोकांच्या घरातील कंदील विझता कामा नये. लोकांची दिवाळी चांगली साजरी व्हावी म्हणून मी दोन दिवस पार्थिव ठेवले, असे उद्धव ठाकरेंनी सांगावे. असं रामदास कदम म्हणाले आहेत. पुढे ते म्हणाले, माझे काहीच म्हणणे नाही. हे जे तुम्ही आज सांगत आहात तेच महाराष्ट्राच्या जनतेला उद्धव ठाकरे यांनी एकदा सांगावे. हेच माझे म्हणणे आहे. असं वक्तव करून रामदास कदम यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केल्याचं पाहायला मिळाले.
रामदास कदम यांनी केलेल्या आरोपांवर उद्धव सेनेचे आमदार अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेऊन कदमांच्या आरोपांवर जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. याविषयी रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे हे उद्धव ठाकरेंचे वडील होते. अनिल परब माहिती देत आहेत. पण उद्धव ठाकरे का गप्प आहेत? असा सवाल उपस्थित केला आहे.
ते म्हणाले, मी उद्धव ठाकरेंना म्हटलं होतं की, तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या पायांचे ठसे घेऊन ठेवा, ते आमचं दैवत आहेत. त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, मला त्यांनीच सांगितलं की मी त्यांच्या हातांचे ठसे घेऊन ठेवले आहेत. असं रामदास कदम यांनी पत्रकार परिषदेतून सांगितलं.
शिंदेसेना अडचणीत सापडल्याचे चित्र
शिंदे सेनेत असलेले माजी मंत्री रामदास कदम यांनी याअगोदरही उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करणारी विधाने केली आहेत. पण आता त्यांनी थेट बाळासाहेब ठाकरे यांच्या पार्थिवाबाबत विधान करून खळबळ उडवून दिली आहे. बाळासाहेब ठाकरे यांचं पार्थिव दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या हातांचे ठसे घेण्यात आले होते ते का घेण्यात आले होते? असा आरोप त्यांनी केला होता. आता या आरोपांमुळे शिंदेसेनेच्या गोठात चर्चा होत असून, रामदास कदम यांच्या एका विधानामुळे शिंदेसेना अडचणीत सापडल्याचे चित्र आहे.
आरोपांचं टायमिंग चुकल्याची चर्चा
एकनाथ शिंदेंपासून शिवसेनेतून अनेक मोठे नेते बाळासाहेब यांच्या तालमीत तयार झालेले आहेत. राजकारणाचे बाळकडू या नेत्यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यापासून घेतले आहे. यामध्ये गुलाबराव पाटील, संजय राठोड, दादा भुसे, विजय शिवतारे, दीपक केसरकर आणि अर्जुन खोतकर या सर्वच नेत्यांच्या नैतिकतेवर कदम यांनी केलेल्या आरोपांमुळे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
जर त्यांची निष्ठा खरोखरच बाळासाहेबांच्या विचारांशी होती, तर त्यांनी तो कथित प्रकार का सहन केला? आणि तो पाहून ते गप्प का राहिले? असे प्रश्न यानिमित्ताने उपस्थित केले जात आहेत. यामुळे रामदास कदम यांच्या आरोपांचं टायमिंग चुकल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हेही वाचा : “25 से 30 नरेंद्र और नीतीश’ vs ‘छह और ग्यारह NDA नौ दो ग्यारह” ; बिहारमध्ये घोषणाबाजीची लढाई सुरु





