शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनाबाबत केलेल्या वादग्रस्त विधानाने राजकीय वादळ निर्माण केले आहे. कदम यांनी दसरा मेळाव्यात दावा केला होता की, बाळासाहेब ठाकरे यांचा मृतदेह दोन दिवस मातोश्रीवर ठेवण्यात आला होता आणि त्यांच्या हाताचे ठसे घेतले गेले होते. तसेच, त्यांच्या निधनाच्या तारखेबाबत आणि मृतदेह मातोश्रीवर ठेवण्याच्या कालावधीबाबत चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली होती. या विधानाने ठाकरे गट संतप्त झाला असून, त्यांचे उपनेते शरद कोळी यांनी कदम यांच्यावर तीव्र शब्दांत टीका करत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ‘झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम’ शरद कोळी यांनी रामदास कदम यांच्यावर हल्लाबोल करताना उपहासात्मक शैलीत टीका केली. ते म्हणाले, “झंडू बाम, झंडू बाम, रामदास कदम झालाय जाम! रामदास कदम, तुम्ही आठ दिवस मातोश्रीबाहेर मुक्काम करत होता, तेव्हा झाडून काढत होता आणि झेंडू बाम शोधत होता. खाल्लेल्या मिठाला जागा, आता भाजपचे सालगडी म्हणून तुमचा वापर होतोय.” कोळी यांनी कदम यांच्या निष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत त्यांना भाजपचे हस्तक असल्याचा टोला लगावला. ‘उद्धव आणि बाळासाहेब ठाकरेंच्या जीवावर मोठे झालात’ पुढे बोलताना कोळी यांनी कदम यांच्यावर आणखी गंभीर आरोप केले. ते म्हणाले, “तुमच्या पत्नीने स्वत: सांगितले की, आम्ही स्टोव्हवर स्वयंपाक करत होतो. मग तुमची हजार कोटींची संपत्ती घाम गाळून कमवली का? उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवावर तुम्ही मोठे झालात आणि आज त्यांच्या विरोधात अपशब्द वापरताय. रामदास कदम, तुम्हाला लाज वाटली पाहिजे! तुमच्या जिभेला हाड आहे की नाही? किती खालच्या थराचे राजकारण कराल?” कोळी यांनी कदम यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या संपत्तीवर प्रश्न उपस्थित करत त्यांचे चारित्र्यच लक्ष्य केले. ‘डान्सबार नव्हे, तमाशा काढा’ डान्सबार प्रकरणावरून कदम यांच्यावर टीका करताना कोळी यांनी आणखी एक हल्ला चढवला. ते म्हणाले, “शहाजहानने आपल्या पत्नीसाठी ताजमहाल बांधला, पण रामदास कदम, तुम्ही तुमच्या पत्नीसाठी डान्सबार बांधला! उद्धव ठाकरेंचे पाय चाटून तुम्ही एवढे मोठे झालात, हे विसरू नका. महाराष्ट्राची जनता सोडा, तुमच्या पोरांची पोरं तुम्हाला धक्के देऊन बाहेर काढतील! आता डान्सबार बंद करून तमाशा काढा आणि तमाशातील नाच्याचे काम करा!” कोळी यांनी या टीकेतून कदम यांच्यावर वैयक्तिक आणि राजकीय पातळीवर जोरदार प्रहार केला. शरद कोळी यांच्या या आक्रमक टीकेनंतर आता रामदास कदम किंवा शिवसेना शिंदे गटाकडून काय प्रत्युत्तर येते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.