मुंबई : शिवसेनेच्या ठाकरे आणि शिंदे गटांमधील राजकीय वाद चव्हाट्यावर आले असताना, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांनी शनिवारी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले. १९९३ मध्ये रामदास कदम यांच्या पत्नी ज्योती कदम यांनी स्वतःला जाळण्याचा प्रयत्न केला होता, असा दावा परब यांनी केला. तसेच या प्रकरणाची सखोल चौकशी आणि कदम यांची नार्को टेस्ट करण्याची मागणी केली. यावर ज्योती कदम यांनी आज माध्यमांसमोर येऊन स्पष्टीकरण दिले आणि आरोप फेटाळले. ज्योती कदम यांचे स्पष्टीकरण ज्योती कदम म्हणाल्या, “अनिल परब यांनी केलेले आरोप पूर्णपणे खोटे आहेत. १९९३ मध्ये आम्ही आर्थिकदृष्ट्या सक्षम नव्हतो, आमच्याकडे गॅस सिलेंडरही नव्हता. मी स्टोव्हवर स्वयंपाक करत असताना माझ्या साडीच्या पदराला आग लागली आणि ही दुर्घटना घडली. मला वाचवताना रामदास यांचे हातही भाजले. त्यांनी मला रुग्णालयात नेले आणि परदेशात उपचारासाठीही नेले. हे खोटे आरोप आम्हाला बदनाम करण्यासाठी केले जात आहेत. मी प्रथमच माध्यमांसमोर बोलत आहे, कृपया आम्हाला त्रास देऊ नका, असं ज्योती कदम यांनी म्हटले. रामदास कदम यांचे प्रत्युत्तर रामदास कदम यांनीही या घटनेवर स्पष्टीकरण देताना सांगितले की, खेड येथील घरी स्टोव्हवर स्वयंपाक करताना ज्योती यांच्या साडीला आग लागली होती. “मी स्वतः त्यांना वाचवले, त्यात माझे हातही भाजले. त्यानंतर सहा महिने जसलोक रुग्णालयात त्यांच्यावर उपचार झाले. मी त्यांची काळजी घेत होतो. खुद्द बाळासाहेब ठाकरे यांनीही ज्योती यांच्या प्रकृतीची विचारपूस केली होती,” असे कदम म्हणाले. परब यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृतदेहासंदर्भात कदम यांनी केलेला दावाही खोटा असल्याचे म्हटले आहे. या साऱ्या आरोप-प्रत्यारोपांमुळे शिवसेनेतील अंतर्गत वाद आणखी तीव्र झाला आहे.