जम्मू-काश्मीरसाठी भाजपकडून ४४ उमेदवारांची पहिली यादी जाहीर, काश्मिरी पंडितांनाही दिली संधी

Jammu Kasmir Election 2024 | जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीत पहिल्या टप्प्यासाठी १५, दुसऱ्या टप्प्यासाठी १० आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी १९ उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. अशी एकुण ४४ उमेदवारांची पहिली यादी आज भाजपकडून जाहीर करण्यात आली आहे.
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. या यादीत माजी उपमुख्यमंत्री आणि जम्मू-काश्मीर विधानसभेचे माजी अध्यक्ष डॉ. निर्मल सिंह यांना तिकीट मिळालेले नाही. 2014 मध्ये बिलवार विधानसभा मतदारसंघातून निर्मल सिंह विजयी झाले होते. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री कविंदर गुप्ता यांनाही उमेदवारी मिळालेली नाही. मात्र, पुढील यादीत कविंदर गुप्ता यांच्या नावाची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या यादीत भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र रैना यांचेही नाव जाहीर करण्यात आलेले नाही.
तसेच पक्षाने राजपोरामधून अर्शीद भट, शोपियातून जावेद अहमद कादरी, अनंतनाग पश्चिममधून मोहम्मद रफीक वानीला मैदानात उतरवले आहे. तर अनंतनागमधून सय्यद वजाहर, किश्तवाडमधून शगुन परिहार, डोडात गजय सिंह राणा यांना उमेदवारी दिली आहे.
दोन काश्मिरी पंडितांना उमेदवारी
काश्मीर खोऱ्यातील दोन जागांवर भाजपने काश्मिरी पंडित यांना उमेदवारी दिली आहे. वीर सराफ यांना शांगस-अनंतनाग पूर्व आणि अशोक भट्ट यांना हब्बाकडलमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
BJP withdraws first list of 44 candidates released for upcoming J&K Assembly Elections; BJP to amend and release the list of candidates again pic.twitter.com/X9tqVoZ9Zv
— ANI (@ANI) August 26, 2024
नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक
जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीसंदर्भात रविवारी नवी दिल्लीत भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह अनेक ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या बैठकीत निवडणुकीची रणनीती, मुद्दे, उमेदवारांची नावे आणि पीएम मोदींच्या राज्यातील संभाव्य सभा यावर चर्चा करण्यात आली. या बैठकीनंतर सोमवारी सकाळपर्यंत भाजप उमेदवारांची नावे जाहीर करेल, अशी अटकळ बांधली जात होती. त्यानुसार आज पहिली यादी जाहीर करण्यात आली आहे.
कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका
कलम 370 हटवल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये पहिल्यांदाच विधानसभा निवडणुका होणार आहेत. याआधी 2014 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये शेवटच्या विधानसभा निवडणुका झाल्या होत्या. मे 2022 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये सीमांकन झाल्यानंतर विधानसभेच्या जागांची संख्या आता 90 झाली आहे. जम्मूमध्ये विधानसभेच्या 43 आणि काश्मीर खोऱ्यात 47 जागा आहेत. यापूर्वी 2014 मध्ये विधानसभेच्या 87 जागांवर निवडणूक झाली होती.
तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका
जम्मू-काश्मीरमध्ये तीन टप्प्यात विधानसभा निवडणुका होतील. पहिल्या टप्प्यातील निवडणूक 18 सप्टेंबरला, दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक 25 सप्टेंबरला, तर तिसऱ्या टप्प्याची निवडणूक 1 ऑक्टोबरला होणार आहे. जम्मू-काश्मीरमध्ये 4 ऑक्टोबरला मतमोजणी होणार आहे.
हेही वाचा:





