पहिला श्रावणी सोमवार; ओतूर येथे श्री कपर्दिकेश्वर मंदिरात विधिवत पूजा

ओतूर – ता. जुन्नर येथील श्री कपर्दिकेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवार निमित्ताने शिवलिंगावर सकाळी ६ वाजता विधिवत पूजा करण्यात आली. पहिल्या श्रावणी सोमवारच्या आरतीचे मानकरी रामदास श्रीधर येवले हे सपत्नीक होते. तसेच अक्षय बाळासाहेब ढमाले हे होते. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष अनिल तांबे, गांधी पानसरे, जितू अण्णा डुंबरे, सागर दाते, सचिन तांबे, अमोल काका डुंबरे आदी उपस्थित होते.
आरती झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले. मंदिरात तांदळाच्या कलात्मक पिंडी तसेच शिवलिंगावर रंगीबेरंगी फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. “हर हर भोलानाथ” च्या जयघोषात भाविकांनी रांगेत दर्शन घेतले. दरवर्षी ओतूर ग्रामदैवत श्री कपर्दिकेश्वराची यात्रा श्रावण महिन्यात भरते.
श्री कपर्दिकेश्वर मंदिरात शिवलिंगावर तयार होणाऱ्या तांदळाच्या कलात्मक पिंडी पाहण्यासाठी व दर्शनासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविक भक्त ओतूर येथे येतात. श्रावणात प्रत्येक सोमवारी कपर्दिकेश्वर मंदिरात तांदळाच्या पिंडी तयार करण्यात येतात. येथे दर्शन घेणाऱ्या भाविक भक्ताच्या मनोकामना पूर्ण होतात, अशी भाविकांची भावना आहे.





