ओतूर : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर येथून जवळच असलेल्या डुंबरवाडी येथे मंगळवारी (दि. ३०) सकाळी सव्वा आठच्या सुमारास दुधाचा टँकर आणि मजुरांनी भरलेल्या पिकअपचा समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात दोन मजूर महिलांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात टँकर चालकासह एकूण ३१ जण जखमी झाले. मंदा शिवराम वाघ (वय ४०, रा. तळेगाव, ता. मुरबाड) आणि वंदना गणेश हिलम (वय २५, रा. खुटल, ता. मुरबाड) असे मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. तर या दीपाली साबळे, शुभांगी साबळे, सोनाबाई भोईर, ढवळाबाई मुकणे, सुवर्णा दराडे, तुळसाबाई साबळे, ताईबाई हगवणे, कुसुम भोईर, पुष्पा वाघ, मारुती वाघ, नितीन गोडे, संगीता मोडक, सुनीता कोकणे, वनिता गोडे, दर्शना वाघ, योगिता भोईर, स्वाती भोईर, शैला बगाड, कलाबाई भोईर, छाया नाडेकर, जयश्री बगाड, मंगल भोईर, हसाबाई भवारी, वैशाली गोंदके, अरुणा बगाड आणि टँकर चालक संजय चव्हाण हे जखमी झाले आहेत. मजुरांनी भरलेली पिकअप (एम.एच. १६ सी.डी. ८१५५) ओतूरकडून आळेफाट्याच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुधाच्या टँकरची (एम.एच. १२ एक्स.एम. ६१२१) जोरदार धडक बसली. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक युवराज जाधव यांसह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली. याप्रकरणी विशाल साबळे आणि अशोक पावडे यांच्या फिर्यादीवरून ओतूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, सहाय्यक पोलीस निरीक्षक लहु थाटे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. माजी आमदार अतुल बेनके यांची मदत माजी आमदार अतुल बेनके यांनी तातडीने अपघातस्थळी भेट देऊन जखमींना उपचारासाठी ओतूर, आळेफाटा आणि मंचर येथील रुग्णालयात हलवण्यासाठी मदत केली. त्यांनी अपघातग्रस्त कुटुंबांना आधार देऊन प्रशासकीय यंत्रणेला आवश्यक सूचना केल्या.