Otur Accident : ओतूरमध्ये काळजाचा थरकाप! ट्रकच्या चाकाखाली चिरडून २८ वर्षीय महिलेचा जागीच अंत
Otur Accident : ओतूर येथील मोनिका चौकात ट्रक आणि स्कुटीचा भीषण अपघात; २८ वर्षीय स्नेहल अहिनवे यांचा मृत्यू.
Updated On:

Otur Accident – ओतूर येथील मोनिका चौकात शुक्रवारी (दि. 3) सकाळी सुमारे 11.30 वाजण्याच्या सुमारास ट्रक व स्कुटी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. स्नेहल रवींद्र अहिनवे (वय 28, रा. अहिनवेवाडी, ता. जुन्नर) असे या अपघातात मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. ट्रक (एमएच 16 सीसी 6064) कल्याण रोडने आळेफाट्याकडे जात असताना मागून येणार्या स्कुटीला (एमएच 14 जे जी 7895) धडक बसली.
धडकेनंतर महिला रस्त्यावर पडल्याने ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ओतूर पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक ज्ञानेश्वर बचगिरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक युवराज जाधव, हवालदार भारती भवानी तसेच श्यामसुंदर जायभाय, किशोर बर्डे, धनंजय पालवे, विश्वास केदार व ट्रॅफिक वॉर्डन शुभम काशीद यांनी घटनास्थळी धाव घेतली.
पोलिसांनी तातडीने वाहतूक सुरळीत केली. जखमी महिलेला तातडीने निरामय हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले; मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या घटनेचा पुढील तपास ओतूर पोलीस करत आहेत.





