मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्षांवर गोळीबार; पाठित गोळी लागल्याने जीव वाचला

Chandrapur News – चंद्रपुरात भरदुपारी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर अज्ञात युवकांनी रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे गोळीबार केला. यामध्ये अमन अन्देवार यांच्या पाठीवर गोळी लागली आहे. त्यांना पोलिसांनी नागपूर येथे उपचारासाठी रेफर केले आहे.
4 जुलै रोजी गजबजलेल्या रघुवंशी कॉम्प्लेक्स येथे दोघांनी मनसे कामगार सेना जिल्हाध्यक्ष अमन अन्देवार यांच्यावर गोळी झाडली. सदर गोळी अन्देवार यांच्या पाठीला लागली. अचानक घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांची तारांबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार हा हल्ला जुन्या वादातून झाला असल्याची माहिती आहे.
8 ऑगस्ट 2020 मध्ये अवैध दारु व्यवसायातील वर्चस्वातून बल्लारपूर शहरात सूरज बहुरिया यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. पोलिसांनी त्या प्रकरणात अमन अन्देवार व आकाश अन्देवार याला अटक केली होती.
वर्ष 2021 मध्ये आकाश अन्देवार याची जामिनावर सुटका झाली होती. त्यानंतर 12 जुलै 2021 मध्ये आकाश अन्देवार यांच्यावर रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये बहुरिया समर्थकांनी गोळीबार केला. आकाशला त्यावेळी 3 गोळ्या लागल्या तो सुदैवाने तो बचावला होता.
मात्र, अन्देवार बंधूंनी बहुरिया यांची हत्या केल्याने त्यांना संपविल्याशिवाय गप्प बसणार नाही, अशी भूमिका बहुरिया समर्थकांनी घेतली होती. आज 4 जुलैला दुपारी अमन अन्देवार हे मित्रांच्या कार्यालयात रघुवंशी कॉम्प्लेक्स मध्ये येत असताना अचानक 2 युवक त्याठिकाणी आले. एक युवक हा वाहनाजवळ थांबला होता तर दुसऱ्याने अन्देवार यांच्यावर गोळी झाडली व पळ काढला.





