गुन्हे दाखल होणार : फटाके विक्री दुकानांसंदर्भात धोरण तयार
पुणे – शहराच्या मध्यवस्तीत किंवा गजबजलेल्या ठिकाणी फटाका स्टॉल लावायला परवानगी नाहीच; परंतु आता त्याचे धोरणच तयार करण्यात आले असून, त्याची अंमलबजावणी होणार आहे. शहरात दुकाने आढळल्यास गुन्हे दाखल होणार असल्याचे महापालिकेकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
महापालिका क्षेत्रात उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार, फटाके विक्री दुकानांसंदर्भात धोरण तयार केले असून, त्याची अंमलबजावणी करावीच लागणार आहे. रहिवासी भागात फटाका विक्री दुकानांना परवानगी देण्यात येणार नसून, दुकाने आढळल्यास गुन्हे दाखल होणार आहे.
शहरात फटाक्यांच्या विक्रीसाठी अग्निशमन विभागाकडून मुख्यत्त्वे परवानगी देण्यात येते. गेल्या वर्षी 1 हजार फटाका विक्री दुकानांना अग्निशमन विभागाने “ना हरकत प्रमाणपत्र’ दिले होते. मात्र, फटाक्यांमुळे होणारे ध्वनी आणि हवा प्रदूषणाचे दुष्परिणाम रोखण्यासाठी उच्च न्यायालयाने आदेश दिले आहेत. त्यानुसार, यंदा धोरणाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
फटाके विक्री धोरणासंर्भात अतिरिक्त आयुक्त शांतनू गोयल यांनी बुधवारी संबंधित विभागाची बैठक घेतली. यात फटाके विक्रीचे परवाने ऑनलाईन आणि ऑफलाईन पद्धतीने देण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला. एक खिडकी योजनेतून परवानगी देण्यात येणार आहेत. फटाके विक्रीची दुकाने उभारण्यासाठी जागांची निश्चिती मालमत्ता व्यवस्थापन लवकरच करणार आहे. परवाना मिळवण्यासाठी अग्निशमन दल आणि आकाशचिन्ह विभागाचा ना हरकत परवाना घेणे आवश्यक असणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई होणार असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.