Pune : नव्या वर्षातच मिळणार अग्निशमनला नवी वाहने

पुणे : शासनाकडून गेल्या २४ वर्षांत चार वेळा महापालिकेची हद्दवाढ करण्यात आली. त्यामुळे पुणे हे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यातील सर्वात मोठे शहर बनले आहे. मात्र, शहरात आलेल्या आपत्तीचे व्यवस्थापन करण्याची जबाबदारी असलेल्या अग्निशमन दलाकडे केवळ २२ आगीचे बंब (फायर इंजिन) असून मागील दोन वर्षांपासून नवीन बंबाची खरेदीच झालेली नाही.
दोन वर्षांपूर्वी या विभागाकडे ४९ बंब होते. मात्र, केंद्र शासनाने १५ वर्षे जुनी झालेली शासकीय वाहने भंगारात काढण्याचे आदेश दिल्याने या विभागाकडील तब्बल २७ बंब आर्युमान संपल्याने सेवेतून हटविण्यात आले.
त्यामुळे केवळ २२ बंबावरच शहराचा कारभार सुरू आहे. तर, ही कमी असलेल्या वाहनांची खरेदी दोन वर्षांपासून सुरू असून अद्यापही या खरेदीस मुहूर्त लागलेला नाही. त्यामुळे नवीन वर्षात तरी अग्निशमन विभाग सक्षम होणार का, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
अग्निशमनदलातील सद्यस्थिती…
शहरात विकास आराखड्यातील निकषांनुसार प्रत्येक एक लाख नागरिकांमध्ये एक अग्निशमन केंद्र असणे आवश्यक आहे. तर, पुणे शहराची लोकसंख्या सुमारे ७० लाखांच्या आसपास गेल्याने शहरासाठी ७० केंद्राची गरज आहे. मात्र, प्रत्यक्षात महापालिकेची शहरभर केवळ २० अग्निशमन केंद्रच सुरू आहेत. तर, आणखी पाच केंद्र तयार असून त्यामध्ये चांदणी चौक, बाणेर (स्मार्ट सिटी), खराडी, महंमदवाडी, धायरी (पारी कंपनी जवळ) या केंद्राचा समावेश आहे. मात्र, ही केंद्र सुरू करायची झाल्यास महापालिकेस आणखी पाच वाहनांची खरेदी करावी लागणार असून मागील दोन वर्षांपासून ही खरेदी प्रक्रीया सुरू आहे.
अन्य कामांचाही भार…
अग्निशमन विभागाकडे शहरात आपत्तीची स्थिती उद्भवल्यास आग नियंत्रण तसेच इतर तातडीच्या मदतीसाठीची जबाबदारी आहे. मात्र, पुण्यात रस्त्यावर सांडलेल्या आॅईल पासून झाडांवर अडकलेले पक्षी, प्राणी वाचविणे, साप पकडणे, राजकीय कार्यक्रमांसाठी मैदानांवर पाणी मारणे, शहरात कचऱ्याला आग लागणार नाही याची दक्षता घेणे अशीही कामे केली जातात. या विभागास गेली अनेक वर्षे पुरेसे मनुष्यबळही नव्हते. आता, खासगी मनुष्यबळ उपलब्ध झालेले असले तरी वाहनेच नसल्याने हे कर्मचारी काम करणार तरी कसे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.





