प्रभात वृत्तसेवा पुणे – पेटता फटाका दुकानाच्या बाजूने फेकल्याने दोन कुटुंबांत झालेल्या हाणामारीत लोखंडी धारदार शस्त्राने हल्ला केल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्यात आले. ही घटना रामटेकडी पिवळा चौक येथे २१ ऑक्टोबर रोजी रात्री घडली होती. या गुन्ह्यातील कल्याणी कुटुंबातील दोघांना वानवडी पोलिसांनी अटक केली आहे. दरम्यान, शुक्रवारी सकाळी उपचारादरम्यान एका तरुणाचा मृत्यू झाला. त्यामुळे आक्रमक झालेल्या मृताच्या नातेवाइकांसह नागरिकांनी पोलिस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन केले. जितेंद्र परमेश्वर ठोसर (३२, रा. रामटेकडी) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. यातील आरोपी खन्नासिंग कल्याणी, लकीसिंग कल्याणी, जल्लूसिंग कल्याणी, जस्सुसिंग कल्याणी, अर्जुनसिंग कल्याणी, गोविंदसिंग कल्याणी (सर्व रा. रामटेकडी) व एक अनोळखी यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी मृताचे नातेवाइक प्राजक्ता अविनाश देडगे (२५. रा. मगरीनबाई चाळ, रामटेकडी) यांनी वानवडी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. वानवडी पोलिसाांनी दिलेल्या माहितीनुसार, रामटेकडी पिवळा चौक येथील एका चायनीजच्या दुकानामध्ये लक्ष्मीपूजेचा कार्यक्रम चालू असताना, लकीसिंग कल्याणी याने पेटता फटाका दुकानाच्या बाजूने फेकला. या वेळी यश ठोसर याने आमच्या दुकानाच्या बाजूने फटाके फेकू नको, दुकानात गॅस आणि तेलाची कढई आहे, आग लागू शकते, असे सांगितले. याचा राग आल्याने लकीसिंग कल्याणी याचे वडील खन्नासिंग कल्याणी, जल्लूसिंग कल्याणी, जस्सुसिंग कल्याणी, अर्जुनसिंग कल्याणी, गोविंदसिंग कल्याणी यांनी हातात लोखंडी पाइप व धारदार शस्त्र घेऊन दुकानावरील अनिता विश्वजित ठोसर, अश्विनी जितेंद्र ठोसर, जितेंद्र ठोसर, विश्वजित ठोसर, वंश विश्वजित ठोसर यांना मारहाण केली. या हाणामारीत जितेंद्र ठोसर यांच्या नाकावर धारदार शस्त्राने वार केल्याने तो गंभीर जखमी झाला होता. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच वानवडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन सर्व जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात परस्परविरोधी गुन्हा दाखल करण्यात आला आहेत.दरम्यान, शुक्रवारी सकाळी जितेंद्र ठोसर यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर वानवडी पोलिसांनी सात जणांवर खुनासह अनुसूचित जाती व जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याचे (ॲट्रॉसिटी) कलम वाढवले. या प्रकरणी वानवडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सहायक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे पुढील तपास करीत आहेत.