ठाण्यात भीषण अग्नितांडव ! लोढा अमारा इमारतीच्या २२व्या मजल्यावर आग; एका महिलेचा मृत्यू

ठाणे : ठाण्यातील कोलशेत परिसरातील लोढा अमारा या २८ मजली गृहसंकुलात २२व्या मजल्यावर गुरुवारी सायंकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली. सायंकाळी ६:४० च्या सुमारास लागलेल्या या आगीमुळे इमारतीतील रहिवाशांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले.
ठाणे महानगरपालिकेच्या अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन पथक आणि आपत्ती प्रतिसाद दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. तीन ते चार अग्निशमन गाड्यांच्या अथक प्रयत्नांनंतर रात्री ७:५८ वाजता ही आग पूर्णपणे आटोक्यात आली.
आगीमुळे २२व्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक २२०३ आणि संपूर्ण लॉबीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या फ्लॅटची मालकी वैशाली कालाव यांच्याकडे असून, तो भाडेकरू वेंकटेश यांना भाड्याने देण्यात आला होता. आगीसह पसरलेल्या दाट धुरामुळे इमारतीतील शेकडो रहिवाशांना श्वास घेण्यास त्रास झाला. अग्निशमन दल, आपत्ती व्यवस्थापन कर्मचारी, आपत्ती प्रतिसाद दल आणि स्थानिक रहिवाशांनी एकत्रितपणे सुमारे ३७५ लोकांना सुखरूप बाहेर काढले.
दुर्घटनेत महिलेचा मृत्यू
आगीच्या धुरामुळे दोन रहिवाशांना गंभीर त्रास झाला. त्यांना तात्काळ हायलँड रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी राजेंद्र तिवारी (फ्लॅट क्रमांक २५०१, २५व्या मजल्यावर) यांची प्रकृती आता स्थिर आहे. मात्र, जयश्री ठाकरे (वय ३६, फ्लॅट क्रमांक २८०५, २८व्या मजल्यावर) यांना रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी मृत घोषित केले. त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी ठाणे सिव्हिल रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. प्राथमिक अंदाजानुसार, शॉर्ट सर्किटमुळे आग लागली असावी, असे सांगितले जात आहे. ठाणे महानगरपालिका आणि कपूरबावडी पोलीस याप्रकरणाचा सखोल तपास करत आहेत. या घटनेमुळे लोढा अमारा गृहसंकुलातील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. आगीमुळे कोलशेत रोड परिसरात वाहतूक कोंडीही झाली, ज्यामुळे अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापन पथकांना घटनास्थळी पोहोचण्यास अडथळे आले.





