शांघाय – चीनच्या उत्तरेकडील हेबेई प्रांतातील एका मार्केटला लागलेल्या भीषण आगीत 8 जण जिवंत जळून खाक झाले आहेत. तर डझनहून अधिक लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. आग इतकी भीषण होती की काही वेळातच धुराच्या काळ्या ढगांनी संपूर्ण शहर व्यापले. चीनमधील भाजी मंडईत ही दुर्घटना घडल्याचे सांगितले जात आहे, जिथे आग लागून आठ जणांचा मृत्यू झाला तर १५ जण जखमी झाले. चिनी माध्यमांनी ही माहिती दिली आहे. चिनी प्रसारमाध्यमांनी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने सांगितले की, शनिवारी झांगजियाकौ शहरात आग लागली. सकाळी 8.40 च्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. सुमारे तासाभरानंतर खूप प्रयत्नानंतर ती विझवण्यात आली. आता आगीचे कारण शोधले जात आहे. चीनमधील इतर माध्यमांनी पोस्ट केलेल्या व्हिडिओंमध्ये शहरातील किआओक्सी जिल्ह्यातील एका बाजारपेठेवर धुराचे प्रचंड काळे लोट, तसेच मोठ्या ज्वाला दिसल्या. लिगुआंग भाजी मंडईत आग लागली, असे कंपनी डेटा प्रदाता किचाचा यांनी सांगितले. 2011 मध्ये हे मार्केट उघडण्यात आले. या बाजारात भाज्या आणि फळांपासून ते सी फूड आणि इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंची विक्री होते.