चेंबूरमध्ये भीषण आग ! एकाच कुटुंबातील सात जणांचा होरपळून मृत्यू

मुंबई – चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनीत रविवारी पहाटे भीषण आग लागल्याची दुर्घटना घडली आहे. या घटनेत एकाच कुटुंबातील सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये तीन लहान मुलांचा समावेश असून शॉर्ट सर्किटमुळे ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
पहाटे 4.30 ते 5.00 वाजताच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. तर या घटनेत जखमी असलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ही घटना गाढ झोपेत असताना घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
प्रेम गुप्ता (वय 30), मंजू गुप्ता (30), प्रेसी गुप्ता (6), नरेंद्र गुप्ता (10) , गीतादेवी गुप्ता (60), अनिता गुप्ता (39) आणि विधी गुप्ता (15) अशी मृतांची नावे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, चेंबूरमधील गायकवाड मार्गावर असलेला सिद्धार्थ कॉलनी हा अतिशय दाटीवाटीचा परिसर आहे.
या परिसरात अनेकांनी एका घरावर दोन मजले उभारले आहेत. ही आग तळमजल्यावरील दुकानात शॉर्ट सर्किटमुळे लागण्याची प्राथमिक माहिती आहे. यानंतर ही आग वरच्या मजल्यावर पसरली. ज्यामध्ये घरातील सात जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर अन्य दोघे गंभीर जखमी झाले.
या आगीची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यासोबतच स्थानिक पोलीस आणि रुग्णवाहिकाही घटनास्थळी दाखल झाल्या. 4 फायर इंजिन आणि 2 जंबो वॉटर टँक यांच्या साहाय्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
पण दाटीवाटीचा परिसर असल्याने या आगीवर नियंत्रण मिळवताना अग्निशमन दलाला शर्थीचे प्रयत्न करावे लागले. त्यानंतर सकाळी 9.15 वाजताच्या सुमारास आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. पण या आगीमध्ये दुकान आणि दुमजली घर जळून खाक झाले.
सर्वप्रथम या घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी गुप्ता कुटुंबातील गंभीर जखमी सात सदस्यांना बाहेर काढून तत्काळ राजावाडी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तेथील डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. यावेळी त्यांनी पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. तसेच मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आणि या घटनेची उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले.





