उंब्रजला आगीत दुकान जळून खाक

चार दुकानांना आगीची झळ; 19 लाखांचे नुकसान
उंब्रज – येथील सैनिक बॅंके समोरील सेवा रस्त्यालगत असणाऱ्या एका दुकानास अचानक शॉर्टसर्कीटने लागलेल्या आगीत फूटवेअरचे दुकान आगीत जळून खाक झाले. तर लगतच्या जेनरिक मेडिकल, वडापाव व चहा सेंटर आणि अन्य एक बेकरी या चार दुकानांना आगीची मोठी झळ बसली. या आगीत संबंधित दुकान मालकांचे एकूण 19 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाल्याची घटना रविवारी रात्री साडेदहा वाजण्याच्या सुमारास घडली.
याबाबत घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी की, महामार्गालगत असणाऱ्या सैनिक बॅंकेच्या समोरील जागेत दुकान गाळ्यांपैकी एका बंद असलेल्या फूटवेअर दूकानाला रविवारी रात्री साडेदहा वाजण्याचे सुमारास अचानक आग लागली. सदरची आग स्थानिक युवकांच्या लक्षात येताच त्यांनी तातडीने सदरची माहिती उंब्रज पोलिसांना दिली.
घटनास्थळी पोलिसांनी धाव घेऊन सेवा रस्त्यावरील वाहतूक बंद करुन आग विझविण्यासाठी स्थानिक नागरिकांनी जाधव यांचा पाण्याचे टॅंकर मागविला. तत्पूर्वी आगीने रौद्ररुप धारण केल्याने शेजारील चार दुकानांना या आगीची मोठ्या प्रमाणात झळ पोहचल्याने लाखो रुपयांची हानी झाली आहे.
सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणण्यात नागरिक व युवकांना यश आले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनास्थळी नागरिक व युवकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. खबरदारीचा उपाय म्हणून वीजपुरवठा खंडीत करण्यात आला होता.
यावेळी सह्याद्री सहकारी साखर कारखाना, कराड नगरपालिका व जयवंत शुगर येथून अग्निशामक बंब आले होते. या माध्यमातून आग आटोक्यात आणण्यात यश मिळाले. या भीषण लागलेल्या आगीत महाराष्ट्र फुटवेअरचे मालक राजकुमार शिंदे याचे 12 लाख, विशाल संभाजी मोहिते यांचे 2 लाख, निलेश कृष्णात राऊत यांचे 1 लाख 50 हजार, विक्रमसिंग अमरसिंग राजपुरोहित यांचे 3 लाख 50 हजार असे सर्वाचे मिळून एकूण 19 लाख रुपयांचे मोठे नुकसान झाले असून त्याचा तलाठ्यांनी पंचनामा केला आहे.





