नेपाळचे माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्याविरुद्ध FIR दाखल, सुशीला कार्की अंतरिम पंतप्रधान झाल्यानंतर कारवाई

Nepal News : नेपाळमधील Gen-Z आंदोलनानंतर माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यासह अनेक नेत्यांनी देश सोडला होता. शुक्रवारी नेपाळच्या माजी सरन्यायाधीश सुशीला कार्की यांनी अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. त्यानंतर शनिवारी माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
Gen-Z आंदोलन आणि हिंसाचार –
नेपाळमध्ये सोशल मीडियावर बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात आणि सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप करत ८ सप्टेंबरपासून Gen-Z आंदोलन सुरू झाले. हे आंदोलन कालांतराने हिंसक बनले. या हिंसाचारात आतापर्यंत सुमारे ५० जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. संतप्त आंदोलकांनी नेपाळच्या संसदेवर हल्ला करून ती जाळली. या घटनेनंतर माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्यासह अनेक नेत्यांनी देश सोडला होता.
सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधानपदी नियुक्ती –
या हिंसक आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी रात्री नेपाळच्या माजी सरन्यायाधीश ७३ वर्षीय सुशीला कार्की यांनी नेपाळच्या पहिल्या महिला अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. Gen-Z आंदोलकांची मागणी होती की, त्यांना तरुण नेते, म्हणजेच Gen-Z पिढीतील नेतृत्व हवे आहे. मात्र, देशाच्या उज्ज्वल भवितव्यासाठी आणि तरुण पिढीला मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवी नेतृत्वाची गरज लक्षात घेऊन सुशीला कार्की यांची अंतरिम पंतप्रधानपदी निवड करण्यात आली.
माजी पंतप्रधान ओली यांच्याविरुद्ध कारवाई –
शनिवारी सुशीला कार्की यांनी काठमांडू येथील सिव्हिल रुग्णालयाला भेट दिली. अशी शक्यता आहे की, त्या आंदोलनात जखमी झालेल्या लोकांची भेट घेऊ शकतात. दरम्यान, माजी पंतप्रधान के. पी. शर्मा ओली यांच्याविरुद्ध पोलिस दडपशाही आणि गुन्हेगारी कृत्यांच्या आरोपाखाली एफआयआर दाखल करण्यात आली आहे. यासंदर्भात तपासाची मागणीही करण्यात आली आहे.
मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता –
सुशीला कार्की यांच्या नेतृत्वाखालील सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार रविवारी होण्याची शक्यता आहे. यासाठी अंतरिम पंतप्रधान राजकीय सल्लागारांशी चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. मंत्रिमंडळात समाविष्ट होणाऱ्या नावांबाबत रविवारपर्यंत निर्णय होण्याची शक्यता आहे. नेपाळमधील ही परिस्थिती देशाच्या राजकीय स्थैर्यासाठी महत्त्वाची ठरणार असून, सुशीला कार्की यांच्या नेतृत्वावर सर्वांचे लक्ष लागले आहे.





