अखरे ‘ती’ जमीन पिंपरी-चिंचवड पालिकेकडे वर्ग

नगरसेवक पंकज भालेकर यांच्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्र्यांनी मिळवून दिले यश
पिंपरी – गत दहा वर्षांपासून प्रलंबित असलेला तळवडे येथील गायरान जमीन प्रश्न अखेर मार्गी लागला आहे. स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निर्णयामुळे यश आले आहे.
तळवडे येथील शासनाचे ताब्यातील गायरान जमीन 23. 30 हेक्टर (58.25 एकर) जमीन पिंपरी-चिंचवड महापालिकेकडे वर्ग केलेल्या निर्णयाची प्रत (महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग शासन, निर्णय क्र. जमीन 3418/742/प्र. क्र. 134/ज-5) उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नगरसेवक पंकज भालेकर यांच्याकडे गुरुवारी मंत्रालयात सुपूर्द केली. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आतापर्यंतच्या इतिहासातील शासनाकडून पालिकेस हस्तांतरित करण्यात आलेल्या जमिनीपैकी सर्वात मोठे क्षेत्र विनामोबदला सार्वजनिक प्रयोजनासाठी देण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासन महसूल व वन विभागाने दिनांक 17 डिसेंबर 2020 रोजी आदेश काढून गायरान जमीन महापालिकेस हस्तांतरित करण्याची कार्यवाही केली. 2017 च्या महापालिका निवडणुकीत तळवडे प्रभागातील राष्ट्रवादी कॉंग्रेसचे 4 नगरसेवक निवडून आले होते. त्यामुळे राज्यात सत्ता आल्यानंतर अजित पवार यांनी मागील दहा वर्षांपासून प्रलंबित असणारा प्रश्न स्थानिक नगरसेवक पंकज भालेकर यांच्या पाठपुराव्यामुळे मार्गी लावला आहे.
या ठिकाणी राज्यातील सर्वाधिक मोठा “डीअर पार्क’ प्रोजेक्ट साकारला जाणार होता. याबाबत 2010 मध्ये तत्कालीन आयुक्त राजीव जाधव यांच्या पुढाकाराने याची आखणी करण्यात आली होती. याठिकाणी वनराईने नटलेला परिसर असून नदीकाठी प्रकल्पाच्या आणि हरणांच्या विविध प्रजातींचे जतन केले जाणार होते. हा परिसर रेड झोन हद्दीत असल्यामुळे बांधकाम विरहीत उद्यान विकसित करण्यात येणार आहे. या परिसरात पर्यटकांना फिरण्यासाठी छोटे रस्ते विकसित केले जाणार आहेत.
शहराच्या सौंदर्यात भर घालणारे उद्यान आता येथे विकसित होणार आहे. या निर्णयामुळे पहिल्यांदाच निवडून आलेल्या तळवडे प्रभागातील राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले असल्याचे दिसून आले.





