अखेर बारामतीमधील ‘सिटी इन’ चौकातील वाहतूक कोंडी सुटली..

बारामती । शहरातल्या मुख्य ठिकाणाच्या वाढत्या वाहतुक कोंडीला नियंत्रणात आणण्यासाठी बारामती वाहतूक पोलिसांनी अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत. त्यांच्याच प्रयत्नामुळे अनेक चौकांनी मोकळा श्वास घेतला आहे.आता पुन्हा एकदा बारामतीमधील कायम गर्दीने गजबजलेल्या ‘सिटी इन’ चौकातील वाहतुक कोंडीला नियंत्रणात आणले आहे.
बारामती वाहतूक नियंत्रणासाठी आणि कारवाईसाठी बारामती पोलिसांऐवजी बारामती वाहतूक शाखा कारवाई करेल अशा सूचना पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी दिल्या होत्या.शहरातील कायम गर्दीने गजबजलेल्या ‘सिटी इन’ चौकात संध्याकाळी ५ ते रात्री ८ वाजेपर्यंत मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत होती. पाच मिनिटांचा रस्ता पार करण्यासाठी अर्धा ते पाऊण तास वाहतुकीत अडकून बसावे लागत होते. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव आणि वाहतूक पोलिसांनी याबाबत माहिती घेतली असता सूर्यनगरी व जळोची रोड परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात या चौकातून ये-जा करत असल्याने संध्याकाळच्या वेळेला मोठ्या प्रमाणावर गर्दी होऊन वाहतुक कोंडी होत असल्याचे लक्षात आले.
यावर उपाययोजना करताना संध्याकाळी साडेपाच ते रात्री आठ वाजेपर्यंत रस्त्याच्या एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी दुभाजक हा बॅरिकेट्स लावून बंद करण्यात आला. त्यानंतर आता हा रस्ता एका बाजूकडून दुसऱ्या बाजूकडे जाण्यासाठी परिस्थितीप्रमाणे खुला असणार आहे. सर्विस रस्त्यांवर जास्त रहदारी होत असल्याने त्या ठिकाणी रोडवर वाहने लागू नयेत यासाठीही कारवाई सुरू आहे. बारामती व परिसरातील नागरिकांनी याबाबत दक्षता घेऊन वाहतूक पोलिसांना सहकार्य करणे आवश्यक असल्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांनी सांगितले.
वाहतूक पोलिसांकडून बारामती शहरात दररोज पेट्रोलिंग सुरू असून आवश्यक त्याठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. येथील सातव चौक परिसरात शाळेजवळ, बालविकास शाळा वाहतूक कोंडी होत होती त्याबाबतही दक्षता म्हणुन शाळा सुटण्याच्या वेळी वाहतूक पोलिसांची नेमणूक केली जात आहे. नागरिकांना सहजरीत्या सुविधा देण्याबाबत बारामती वाहतुक शाखा कायम प्रयत्नशील आहे.
..तर नागरिकांनी तक्रारी कराव्यात!
वाहतुक सुरळीत करण्यासाठी अतिक्रमीत व्यावसायिक दुकाने, टपरीधारकांना सूचना केल्या आहेत. जे वारंवार सांगून ऐकत नाहीत अशांवर कारवाई करण्यात येणार आहे. आपल्या राहत्या परिसरात अतिवेगाने वाहने चालवून हुल्लडबाजी करणाऱ्यांची माहिती किंवा वाहतुकीबाबत काही अडचणी तक्रारी असल्यास नागरिकांनी पोलीस निरीक्षकांच्या 7777924603 या क्रमांकावर व्हॉट्सॲप मॅसेज करून करून कळवाव्यात.
~चंद्रशेखर यादव, पोलीस निरीक्षक





