खालापूर, (वार्ताहर) – एका सोळा वर्षीय मुलाचा बळी घेणाऱ्या नागाला पकडण्यात सर्पमित्रांना यश आले आहे. मागील अनेक दिवसांपासून कुंभिवली गावात (ता. खालापूर) या नागाची दहशत होती. अखेर या नागाला सर्पमित्र अमोल ठकेकर यांनी मंगळवारी (दि.८) पकडले आणि स्थानिकांनी सुटकेचा निश्वास टाकला. कुंभिवली गावात राठोड कुटुंब राहत आहे. १८ सप्टेंबरला राठोड पती-पत्नी जळगावला गेले होते. तेव्हा घरी त्यांची जुळी मुले होती. ही मुले झोपली असता एक नाग तिथे आला आणि त्याने अर्जुन या मुलाला दंश केला. स्थानिकांनी अर्जुनला उपचारासाठी कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात नेले. परंतु वाटेतच त्याचा मृत्यू झाला. दरम्यान सर्पमित्रांनी राठोड यांच्या घराच्या परिसरात नागाचा शोध घेतला पण तो आढळला नाही. मंगळवारी (दि.८) स्थानिकांना पुन्हा तो नाग दिसला. त्यानंतर सर्पमित्र अमोल ठकेकर यांनी तत्काळ गावात येत राठोड यांच्याच घरात पुन्हा नागाला पकडले.