अखेर ठरलं! विजय शिवतारे लोकसभा निवडणूक लढवणार; बारामतीत रंगणार तिहेरी लढत

Baramati Loksabha Vijay Shivtare| बारामती लोकसभा मतदार संघातून विद्यमान खासदार सुप्रिया सुळे विरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यात लढत होणार असल्याचे म्हटले जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी माजी मंत्री विजय शिवतारे यांनी पवार कुटुंबियांवर टीका केली होती.
सुप्रिया सुळे यांच्या विरोधात अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार रिंगणात उतरणार आहेत. परंतु आता या लढतीत तिसऱ्या खेळाडूने मैदानात उतरण्याची घोषणा केली आहे. शिंदे गटाचे नेते आणि माजी मंत्री विजय शिवतारे यांनी लोकसभेत आरपारची लढाई करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. शिवतारे यांनी बारामती लोकसभेला अपक्ष उतरणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी याबाबत भाष्य केले होते. त्यानंतर विजय शिवतारे हे बारामती लोकसभेची निवडणूक लढवण्यावर ठाम आहेत. चर्चेनंतर पत्रकार परिषदेत शिवतारे यांनी पुन्हा एकदा अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.
काय म्हणाले विजय शिवतारे?
“बारामती लोकसभा मतदार संघ हा कोणाचा सातबारा नाही, देशातील ५४३ पैकी एक मतदारसंघ आहे. येथे मालकी कोणाची नाही. म्हणून पवार-पवार करण्याऐवजी आपण आपला स्वाभीमान जागा करून लढलं पाहिजे विशेषतः अजित पवार, २०१९ च्या निवडणुकीत, मी त्यांच्या मुलाच्या विरोधात प्रचार केला होता तो राजकारणाचा भाग आणि माझं कर्तव्य म्हणून केला होता. पण अजित पवारांनी सभ्यतेची नीच पातळी गाठली. ते महायुतीत आले तेव्हा मी त्यांचा सत्कार केला, तरी पुढचे सात-आठ महिने त्यांची गुर्मी तशीच होती. कोणाशी नीट बोलत नाहीत,” शिवतारे म्हणाले.
५ लाख ५० हजार मतदार पवार विरोधक
“अजित पवार हे उर्मटपणाबद्दल पूर्ण बारामती मतदारसंघात लोक म्हणत आहेत की, आता सुनेत्राताई आणि सुप्रिया सुळे आहेत. पण अजित पवार उर्मट आहेत म्हणून आम्ही त्यांना मतदान करणार नाहीत सुप्रीय सुळेंना मतदान करू. त्यावेळी मी ठरवलं की, बारामतीत सहा लाख ८६ हजार मतदान पवारांच्या समर्थनात आहे, पण ५ लाख ५० हजार मतदार पवार विरोधक आहेत. मग त्यांना अशा नाआवडत्या लोकांना मतदान न करण्याची संधी मिळाली नाही तर तो लोकशाहीचा घात होतोय हे लक्षात आल्यानंतर मी निवडणूक लढवण्याचं ठरवलं”. असेही शिवतारे यावेळी म्हणाले.
हेही वाचा:





