काही कारणामुळे परीक्षा न देता आल्यास “विशेष संधी’

पुणे – करोनाची बाधा, परीक्षेच्या कालावधीत सीईटी, एकाचवेळी विद्यापीठाच्या दोन विषयांच्या परीक्षा या कारणाने परीक्षा देऊ न शकणाऱ्यांना विशेष परीक्षेस बसण्याची परवानगी दिली जाणार आहे.
त्यासाठी आवश्यक कागदपत्रे परीक्षा समन्वयक कक्षास सादर करावेत, असे आवाहन सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा विभागाने केले आहे.
करोना पार्श्वभूमीवर यंदा ऑनलाइन व ऑफलाइन या दोन्ही माध्यमातून दि. 12 ऑक्टोबरपासून परीक्षा सुरू होत आहे. तसेच पुण्यासह नगर, नाशिक या विद्यापीठाच्या कार्यक्षेत्रात करोना प्रादुर्भाव कायम आहे. अशा परिस्थितीत परीक्षा होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये थोडी धाकधूक आहे.
मात्र, काही कारणाने विद्यार्थी परीक्षा देऊ शकले नाहीत, अशांची स्वतंत्र परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी कारणही तितकेच योग्य असणे आवश्यक आहे. तसे कागदपत्र उपलब्ध असणे महत्त्वाचे आहे.


