एआयबीने दिलेला अहवाल प्राथमिक यावरून अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही – मुरलीधर मोहोळ

पुणे – अहमदाबाद विमान अपघात प्रकरणात एआयबीने दिलेला अहवाल हा प्राथमिक आहे. या अहवालावरून काहीच निष्कर्ष काढता येणार नाही. त्याबाबत चौकशी आणि तपासणी सुरू असून, अंतिम अहवाल येण्यास थोडा वेळ लागणार आहे, अशी माहिती केंद्रीय नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली.
पुण्यातील एका कार्यक्रमानंतर या विमान अपघात प्रकरणी १५ पानी अहवाल प्रसिद्ध झाल्याबाबत मोहोळ यांना विचारले असता ते म्हणाले, हा प्राथमिक अहवाल असून आपल्याला या अहवालावर निष्कर्ष काढता येणार नाही. एआयबीने खूप चांगले काम केले आहे. पूर्वी एखादा अपघात झाला की ब्लॅक बॉक्स हा बाहेरच्या देशात पाठवावा लागत होता.
आता आपल्या देशातच सर्व अत्याधुनिक तंत्रज्ञान असल्याने ब्लॅक्स बाॅक्सची तपासणी भारतातच होत आहे. प्राथमिक अहवालात जे संभाषण समोर आले, त्यावरून अंतिम निष्कर्ष काढता येणार नाही. पुढील तपासणी आणि चौकशी आवश्यक असून, अंतिम अहवालास वेळ लागणार असल्याचे मोहोळ यांनी सांगितले.





