Ajit Pawar Plane Crash – राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान अपघाताचा प्राथमिक तपासणी अहवाल २८ फेब्रुवारी पूर्वी येईल, अशी माहिती सरकारी तपास यंत्रणांनी दिली आहे. हा तपासणी अहवाल आल्यानंतर पुढील कार्यवाहीची दिशा ठरवली जाणार आहे. या अपघाताची चौकशी करण्याचे नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने तत्काळ आदेश दिले होते. त्यानुसार या चौकशीसाठी एअरक्राफ्ट अॅक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरो (एएआयबी) यांची नेमणूकही करण्यात आली आहे. त्यांनी सुरू केलेल्या तपासणीत विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकाॅर्डर होते या डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील रेकाॅर्डिंग यशस्वीरीत्या डाउनलोड करण्यात आला आहे. मात्र कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (सीव्हीआर)ला उष्णतेमुळे नुकसान झाल्याची माहिती मंत्रालयातर्फे देण्यात आली आहे. हनीवेल या कंपनीने हे विमान बनवले असल्याने त्यांच्याकडून तांत्रिक मदत मागण्यात आली आहे. एएआयबीचा तपास हा तांत्रिक आणि पुराव्यावर आधारित असल्याचेही सरकारने स्पष्ट केले आहे. दरम्यान, नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) व्हीएसआर विमान कंपनीच्या नियम पालनाबाबतच्या ५१ प्रकारच्या तपासण्या केल्या आहेत. उड्डाण सुरक्षा प्रणाली, ड्युटी वेळेच्या मर्यादा, मेंटेनन्स, दस्तावेज तसेच स्टेशन सुविधा या तपासण्यांचा यात समावेश आहे. मंत्रालयाने डीजीसीएला नियामक अनुपालन, ऑपरेशनल कंट्रोल सिस्टम, देखभाल पद्धती, क्रू प्रशिक्षण मानके, सुरक्षा व्यवस्थापन प्रणाली आणि सीव्हीआर/एफडीआर देखरेखीचा व्यापक आढावा घेण्यासाठी संबंधित कंपनीचे विशेष ऑडिट करण्यास सांगितले आहे. हे ऑडिट चार फेब्रुवारी २०२६ रोजी सुरू झाले आणि लवकरच पूर्ण होण्याची अपेक्षा आहे. डीजीसीएच्या अंमलबजावणी धोरण आणि प्रक्रिया नियमावलीनुसार निष्कर्षांचे पुनरावलोकन केले जाईल आणि कारवाई केली जाईल, असे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. याशिवाय अत्युच्च दर्जाच्या व्यक्तींच्या आवागमनाचे महत्त्व लक्षात घेऊन नाॅन शेड्यूल्ड आॉपरेटर्स आणि एअरोड्रोमचे विशेष ऑडिट करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. हे ऑडिट टप्प्याटप्प्याने केले जात आहेत आणि आवश्यकतेनुसार योग्य अंमलबजावणी कारवाई केली जाणार असल्याचेही मंत्रालयाकडून नमूद करण्यात आले आहे.