Pune News : पुणेकरांचा प्रवासादरम्यानचा वेळ वाचणार! विद्यापीठ चौकातील बहुप्रतिक्षित ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाचे मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते लोकार्पण

Pune News : पुणेकरांचे वाहतूक कोंडीतून सुटका करणारे मोठे स्वप्न आज प्रत्यक्षात उतरत आहे. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA) तर्फे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ चौकात उभारण्यात आलेल्या अत्यंत महत्त्वाकांक्षी ‘डबल डेकर’ उड्डाणपुलाचा लोकार्पण सोहळा आज, रविवार दिनांक ८ मार्च २०२६ रोजी संपन्न होत आहे.
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने या पुलाचे उद्घाटन सकाळी १०:०० वाजता होणार असून, त्यानंतर हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाईल.
आमदार सिद्धार्थ शिरोळे यांच्या विशेष पाठपुराव्यातून साकारलेल्या या प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री सुनेत्रा ताई पवार, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत दादा पाटील आणि राज्यमंत्री माधुरीताई मिसाळ यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
वाहतुकीला मिळणार नवा वेग
गणेशखिंड ते बाणेर आणि बाणेर ते गणेशखिंड अशा दोन टप्प्यांतील या उड्डाणपुलामुळे औंध, बाणेर, पाषाण आणि शिवाजीनगर परिसरातील प्रवाशांचा वेळ वाचणार आहे.
या उड्डाणपुलामुळे विद्यापीठ रस्ता, पाषाण आणि बाणेर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होऊन नागरिकांचा प्रवास अधिक सुलभ होणार आहे. विद्यापीठ चौकात मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेऊन या एकात्मिक दुमजली उड्डाणपुलाची उभारणी करण्यात आली आहे.
मेट्रो मार्गिका आणि वाहनांसाठीचा रस्ता एकाच खांबावर (डबल डेकर) अशी या पुलाची रचना असून, यामुळे विद्यापीठ चौकातील जुनाट वाहतूक कोंडीचा प्रश्न कायमचा सुटण्यास मदत होईल.
भाजप पुणे शहर अध्यक्ष धीरज घाटे आणि सरचिटणीस प्रमोद कोंढरे यांनी या सोहळ्यासाठी पुणेकरांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे. या भव्य प्रकल्पामुळे पुणे महानगराच्या दळणवळण व्यवस्थेत एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
हेही वाचा :





