फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध थेट पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करा; शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांचे आवाहन

पुणे – राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागामार्फत पवित्र पोर्टलच्या माध्यमातुन सुरु असलेली शिक्षक भरती ही पूर्णपणे पारदर्शक व संगणकावर आधारित प्रक्रिया असून त्यामध्ये कोणताही मानवी हस्तक्षेप होणार नाही याची दक्षता घेण्यात आलेली आहे, असे शिक्षण आयुक्त सूरज मांढरे ( Education Commissioner Suraj Mandhare ) यांनी स्पष्ट केले आहे. मात्र तरीही कोणी फसवणूक करत असल्यास त्या विरुद्ध संबंधित पोलीस ठाण्यात तातडीने फिर्याद दाखल करावी. फिर्याद दाखल केल्यास प्रशासनाकडून देखील अशा तक्रारदारास पूर्ण सहकार्य करण्यात येणार असल्याचे मांढरे यांनी सांगितले आहे.
शिक्षक भरती ही आता महत्त्वाच्या टप्प्यावर पोहोचली असून पात्र अभियोग्यताधारकांना संस्था, जिल्हा परिषदे मधील नियुक्ती संदर्भात याद्या तयार करण्याचे संगणकीय कामकाज सध्या सुरू आहे. मात्र अभियोग्यता धारकांमधील काही स्वयंघोषित खोडसाळ व्यक्ती तसेच काही अनधिकृत दलाल या प्रक्रियेबाबत अभियोग्यताधारकांमध्ये संभ्रम निर्माण करून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे.
ही प्रक्रिया पूर्णपणे संगणकीकृत असून त्यामध्ये हस्तक्षेपाला वाव नाही, असे मांढरे यांनी जाहीर केले आहे. खोडसाळपणा करणाऱ्या व्यक्ती तसेच त्यांच्या संपर्कात असलेल्या व्यक्ती यांच्या वर पोलीस विभागामार्फत स्वतंत्रपणे निगराणी ठेवणेत येत आहे, असेही त्यांनी सांगितले आहे.
अमुक जिल्हा परिषद मध्ये नोकरी लावून देतो, अमुक संस्थेत भरती करून देतो, जवळच्या संस्थेत नोकरी देतो या विविध प्रकारची खोटी आश्वासने देऊन मागील भरतीच्या वेळी काही दलालांनी उमेदवारांची फसवणूक केली असल्याची बाब काही अभियोग्यताधारकांनी व्यक्त केली आहे.
संगणकाद्वारे आपोआप होणाऱ्या प्रक्रियेचे श्रेय घेऊन काही मंडळी अशाप्रकारे अभियोग्यताधारकांची फसवणूक करू शकतात. त्या सर्व बाबींना पायबंद घालण्याचा कसोशीने प्रयत्न करण्यात येत आहे. असे दलाल अथवा अन्य मंडळी कृत्य करीत असतील तर तातडीने ती बाब प्रशासन अथवा नजीकच्या पोलीस ठाण्याच्या निदर्शनास आणून द्यावी, असे आवाहनही मांढरे यांनी केले आहे.





