१८ व १९ नोव्हेंबरला शाळा सुरूच राहणार; शिक्षण विभागाच्या सुधारित सूचना

पुणे – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १८ व १९ नोव्हेंबर रोजी शाळेला सरसकट अथवा कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर करण्यात आली नसल्याचे शिक्षण आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. त्याचप्रमाणे ज्या शाळांमधील शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामकाजासाठी झाली आहे, तेथून जवळील शाळेतील शिक्षकांच्या मदतीने दि. १८ व १९ नोव्हेंबर रोजी शाळा सुरू ठेवाव्यात, अशाही शिक्षण विभागाने सुधारित सूचना दिल्या आहेत.
विधानसभा निवडणुकीमुळे राज्याच्या उपसचिवांनी परिपत्रक प्रसिद्ध केले होते. त्यात तीन दिवस शाळांना सुट्टी देण्याबाबत उल्लेख होता. त्यावरुन संभ्रम निर्माण झाला होतो. मात्र ज्या शाळेतील सर्व शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झाली असल्यामुळे एकही शिक्षक शाळेत उपलब्ध असणार नाही, अशा शाळांबाबत स्थानिक स्तरावर मुख्याध्यापकांनी त्यांच्या अधिकारात सुट्टी जाहीर करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
मात्र, त्या निर्णयात सुधारणा करण्यात आली आहे. सर्व शिक्षक निवडणूक कामसाठी असल्यास, ती शाळा बंद न ठेवता जवळच्या शाळेतील शिक्षकांच्या मदतीने शाळा सुरू ठेवाव्यात. मात्र त्या शाळेतील शिक्षकांची नियुक्ती निवडणूक कामासाठी झालेली नसावी, असेही शिक्षण आयुक्त सूरज मांढरे यांनी शनिवारी सुधारित निर्णयाचे परिपत्रक प्रसिद्ध केले.
मांढरे म्हणाले, 18 व 19 रोजी सर्व शाळा सुरू राहतील. कोणतीही सार्वत्रिक सुट्टी जाहीर केलेली नाही. केवळ परिस्थिती विचारात घेऊन विशिष्ट शाळांना स्थानिक पातळीवर मुख्याध्यापक यांनी सुट्टी द्यावी,अशा सूचना आहेत. ही सरसकट व सार्वजनिक सुट्टी नाही, याची नोंद सर्वांनी घ्यावी. तसेच कोणत्याही शाळा अनावश्यकरीत्या बंद राहणार नाहीत, याचीही दक्षता घेण्याबाबतच्या सूचना सर्व शिक्षणाधिकारी यांना देण्यात आल्या आहेत.





