चंद्रशेखर बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करा; ठाकरे गटाची मागणी, नेमकं प्रकरण काय?

मुंबई : भाजपमध्ये आपल्याला एकही बंडखोरी नको, एक जरी बंडखोरी झाली किंवा चुकीचे बटन दाबले तर सत्यानाश होईल. आता भंडाऱ्यातील सर्व मोबाइल आणि व्हाट्सअप ग्रुप सर्व्हेलन्सवर टाकले असून सर्वांवर बारीक करडी नजर राहणार आहे, असे भाजप नेते चंद्रशेखर बावनुकळेंनी म्हटले.
याच मुद्द्यावरून ठाकरेसेनेचे खासदार संजय राऊत यांनी बावनकुळेंवर निशाणा साधला आहे. फोन सर्व्हेलन्सबाबत केलेले बावनकुळेंचे विधान हे गंभीर असल्याचे म्हणत राऊतांनी बावनकुळेंवर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी केली आहे.
संजय राऊत यांनी शुक्रवारी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेल्या विधानाबाबत विचारणा करण्यात आली. तेव्हा राऊत म्हणाले की, चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावर इंडियन टेलिग्राफ ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून त्यांना तत्काळ अटक करा आणि त्यांची चौकशी करा.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी कोणत्या प्रकारचे पेगॅसिसचं मशीन स्वत: आणलेले आहे का? की भाजपाच्या कार्यालयात लावलेले आहे? किंवा त्यासाठी काही खासगी लोक कामाला लावले आहेत का? असे सवाल त्यांनी केला.
तसेच, हा विषय फक्त भाजपच्या संदर्भात नसून महाराष्ट्रातील सर्व विरोधी प्रमुख नेत्यांचे देखील फोन अशा प्रकारे ऐकले जात आहेत. त्यांचे व्हॉट्सअॅप पाहिले जात आहेत. हे आता चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले आहे.
चंद्रशेखर बावनकुळे, रवींद्र चव्हाण आणि मुंबईतील काही बिल्डर्स आणि नागपूरमधील काही यंत्रणा यांनी एकत्र येऊन एक वॉर रुम सुरू केले आहे. त्या माध्यमातून शिंदेंच्या नेत्यांचेही फोन सर्व्हिलन्सवर आहेत असा आरोप राऊतांनी केला आहे.




