उत्तरप्रदेशातील सर्व जागा लढवणे ही कॉंग्रेसची मोठी कामगिरी : प्रियंका गांधी

नोएडा – जवळपास तीन दशकांनंतर कॉंग्रेस उत्तरप्रदेशातील विधानसभेच्या सर्व 403 जागा लढवणार आहे. माझ्या दृष्टीने ती मोठी कामगिरी आहे. आम्ही चांगली लढत देऊ, असा विश्वास कॉंग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी सोमवारी व्यक्त केला.
उत्तरप्रदेशात प्रामुख्याने भाजप आणि सपमध्ये लढत होण्याचा अंदाज वर्तवला जात आहे. त्याशिवाय, बसप हाही निवडणूक रिंगणातील महत्वाचा पक्ष आहे. त्या पक्षांच्या तुलनेत कॉंग्रेसकडे दुबळा प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. त्यापार्श्वभूमीवर, प्रियंका यांनी पत्रकारांशी बोलताना यावेळी कॉंग्रेसची कामगिरी उंचावण्याचा विश्वास बोलून दाखवला.
भाजपशासित उत्तरप्रदेशात प्रचारात सहभागी होणाऱ्या कॉंग्रेसच्या काही नेत्यांविरोधात गुन्हे दाखल केले जात आहेत. उत्तरप्रदेशात सक्रिय झाल्यापासून मी माझ्या मनाची तयारी केली आहे.
गुन्हे दाखल झाले, अटक झाली किंवा तुरूंगात टाकले गेले तरी आम्ही मागे हटणार नाही. जनतेसाठी लढण्यास आम्ही सज्ज आहोत, असे त्या म्हणाल्या. मागील वेळची निवडणूक कॉंग्रेसने सपशी हातमिळवणी करून लढवली होती. त्यावेळी कॉंग्रेसच्या वाट्याला अतिशय कमी जागा आल्या होत्या.





