FIFA World Cup : पहिल्याच सामन्यात रोनाल्डोचा फ्लॉप शो! पण ‘त्या’ कृतीने जिंकलं मनं (Video)
फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup) स्पर्धेला अत्यंत धडाकेबाज सुरुवात झाली असून, जगातील अव्वल फुटबॉलपटू आपल्या देशाला विश्वविजेते बनवण्यासाठी मैदानात सर्वस्व पणाला लावत आहेत.

FIFA World Cup : फिफा विश्वचषक 2026 (FIFA World Cup) स्पर्धेला अत्यंत धडाकेबाज सुरुवात झाली असून, जगातील अव्वल फुटबॉलपटू आपल्या देशाला विश्वविजेते बनवण्यासाठी मैदानात सर्वस्व पणाला लावत आहेत. या स्पर्धेत एका बाजूला अर्जेंटिनाचा महान खेळाडू लिओनेल मेस्सीने अल्जेरिया विरुद्धच्या सामन्यात गोलची शानदार हॅट्ट्रिक करत आपल्या संघाला दणदणीत विजय मिळवून दिला.
मात्र, दुसऱ्या बाजूला या विश्वचषकात (FIFA World Cup) एक मोठा उलटफेर पाहायला मिळाला आहे. जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या ख्रिस्तियानो रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला जागतिक क्रमवारीत ४५ व्या क्रमांकावर असलेल्या डीआर कांगो (DR Congo) संघाने १-१ अशा बरोबरीत रोखले. पोर्तुगालचा स्टार खेळाडू ख्रिस्तियानो रोनाल्डोला या सामन्यात आपल्या नावाला साजेशी कामगिरी करता आली नाही.
जोआओ नेवेसने मिळवून दिली आघाडी
मुख्य प्रशिक्षक रॉबर्ट मार्टिनेज यांच्या मार्गदर्शनाखाली खेळणाऱ्या पोर्तुगाल संघाने सामन्याच्या सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे अत्यंत आक्रमक खेळ केला. पोर्तुगालचा युवा मिडफिल्डर जोआओ नेवेस याने सामन्याच्या सुरुवातीलाच एक अप्रतिम गोल करत संघाचे खाते उघडले आणि १-० अशी आघाडी मिळवून दिली. पोर्तुगालचा हा फॉर्म पाहून हा सामना एकतर्फी होईल असे वाटत होते.
DR Congo fans chanting “MESSI! MESSI! MESSI!” in front of Cristiano Ronaldo.
Just look at his reaction. 😭 pic.twitter.com/xJc1HCo2Ay
— MC (@CrewsMat10) June 17, 2026
मात्र, डीआर कांगो संघाने जोरदार मुसंडी मारली. पहिल्या सत्राचा खेळ (हाफ टाईम) संपण्यापूर्वी कांगोच्या योन विसा याने एक दमदार गोल करत सामन्यात १-१ अशी बरोबरी साधली. यानंतर दुसऱ्या सत्रात दोन्ही संघांना गोल करता आला नाही आणि सामना बरोबरीत सुटला.
ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी वाईट स्वप्न
पोर्तुगालचा कर्णधार आणि स्टार स्ट्रायकर ख्रिस्तियानो रोनाल्डोसाठी हा सामना एखाद्या वाईट स्वप्नासारखा (FIFA World Cup) ठरला. संपूर्ण सामन्यात डीआर कांगोच्या बचावपटूंनी त्याला जखडून ठेवले. संपूर्ण ९० मिनिटांच्या खेळात चेंडू केवळ २५ वेळा रोनाल्डोकडे आला, ज्याचा तो गोल करण्यासाठी फायदा उठवू शकला नाही. धक्कादायक बाब म्हणजे, आंतरराष्ट्रीय फुटबॉलमध्ये रोनाल्डोचा हा खराब फॉर्म कायम असून, गेल्या सलग १० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याला एकही गोल करता आलेला नाही.
रोनाल्डोने जिंकले मन!
सामना संपल्यानंतर स्टेडियमबाहेर पडणाऱ्या डीआर कांगोच्या चाहत्यांनी रोनाल्डोला चिडवण्यासाठी अर्जेंटिनाच्या ‘लिओनेल मेस्सी’च्या नावाचा जोरदार जयघोष सुरू केला. रोनाल्डोसाठी हा क्षण नक्कीच निराशाजनक होता. मात्र, याच दरम्यान मैदानात एका वेगळ्याच घटनेने सर्वांचे लक्ष वेधले.
रोनाल्डो मैदानात असताना त्याचा एक चाहता सुरक्षा यंत्रणा भेदून थेट त्याच्या दिशेने धावत आला. अशा वेळी संतप्त न होता, रोनाल्डोने मोठ्या मनाने त्या चाहत्याला मिठी मारली आणि त्याची इच्छा पूर्ण केली. सामना बरोबरीत सुटला असला आणि चाहत्यांनी हुल्लडबाजी केली असली, तरी रोनाल्डोने दाखवलेल्या या खिलाडूवृत्तीचे आणि दिलदारपणाचे सोशल मीडियावर सर्वत्र कौतुक होत आहे.






