FIFA World Cup : धक्कादायक! “विमान पकडा अन् अमेरिका सोडा…”; सामना संपताच इराणी संघासाठी मैदानात आदेश, सगळेच चक्रावले
FIFA World Cup : सध्या जगावर फुटबॉलचा फिवर चढला आहे. त्यातच या विश्वचषकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे.

FIFA World Cup : सध्या जगावर फुटबॉलचा फिवर चढला आहे. त्यातच या विश्वचषकातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध २-२ अशी अटीतटीची बरोबरी साधल्यानंतर इराणच्या संघाला तातडीने अमेरिका सोडण्याचे आदेश देण्यात आले. ज्यामुळे इराणच्या फुटबॉल संघाचे मुख्य प्रशिक्षक अमीर घालेनोई यांनी नाराजी व्यक्त केली.
घडलेल्या या सगळ्या प्रकारावर मुख्य प्रशिक्षक घालेनोई यांनी,”सामन्यानंतर खेळाडूंसाठी विश्रांती घेणे अत्यंत गरजचे असते. मात्र, सामन्यानंतर ताबडतोब आम्हाला अमेरिका सोडून मेक्सिकोमधील तिहुआना याठिकणी आमच्या प्रशिक्षण शिबिरात जाण्यास सांगितले”, असे त्यांनी म्हटले. हा सामना लॉस एंजेलिसमधील सोफाय स्टेडियमवर खेळला गेला.
यावेळी बोलताना घालेनोई यांनी, “सामन्यानंतर आम्हाला विश्रांती आणि सावरण्यासाठी वेळही दिला गेला नाही. सामना संपताच आम्हाला तातडीने निघायला सांगण्यात आले. खेळाडूंसाठी सामन्यांनंतर विश्रांती अत्यंत महत्त्वाची असते, पण आम्हाला थेट विमानात बसून तिहुआनाला परत जाण्यास सांगण्यात आले. या गोष्टीचा आम्हाला मोठा त्रास सहन करावा लागत आहे. आम्हाला कुठलेही पूर्वसूचना देण्यात आली नाही. आम्ही सामन्याच्या दोन दिवस आधी येणार होतो आणि सामन्यानंतर एक रात्र कॅलिफोर्नियात मुक्काम करून दुसऱ्या दिवशी परतणार होतो. परंतु, अचानक आम्हाला देश सोडण्याचे आदेश देण्यात आले” अशी माहिती देत त्यांनी या सर्व प्रकारावर नाराजी व्यक्त केली आहे.
इराणच्या कर्णधाराकडून तीव्र नाराजी व्यक्त (FIFA World Cup)
इराणचा कर्णधार मेहदी तारेमी यानेही या परिस्थितीवर तीव्र नाराजी व्यक्त केली. यावेळी त्यांनी बोलताना, त्यांच्या फुटबॉल फेडरेशनचे अधिकारी, साहाय्यक कर्मचारी आणि माध्यम प्रतिनिधींसह अनेक सदस्यांना अमेरिकेने व्हिसा नाकारल्यामुळे ते संघासोबत प्रवास करू शकले नाहीत.” असे म्हटले.
तारेमी म्हणाला की, “आम्हाला तातडीने लॉस एंजेलिस सोडावे लागले, जे आमच्या संघासाठी अजिबात योग्य नाही. मला वाटते की, फिफाने या प्रकरणात आम्हाला अधिक मदत करायला हवी. सध्या आमच्यासाठी सर्वकाही एखाद्या आपत्तीसारखे सुरू आहे.”
खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची शक्यता (FIFA World Cup )
इराणच्या संघाचा पुढील सामना देखील रविवारी याच सोफाय स्टेडियमवर बेल्जियमविरुद्ध होणार आहे. म्हणजेच, तातडीने मेक्सिकोला परत पाठवल्यानंतर या आठवड्याच्या शेवटी इराणच्या संघाला पुन्हा प्रवासाचा त्रास सहन करत सामन्यासाठी अमेरिकेत परत यावे लागणार आहे. या सततच्या प्रवासामुळे खेळाडूंच्या कामगिरीवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.






