Fertilizer Purchase : खत खरेदीसाठी ‘एफएफएफएस’ प्रणाली २२ ऑक्टोबरपासून लागू
Fertilizer Purchase :

– खतांचा साठा, उपलब्धता व आगाऊ बुकिंगची माहिती मोबाईलवर मिळणार
Fertilizer Purchase : शेतकऱ्यांना खत खरेदीची प्रक्रिया सुलभ, पारदर्शक आणि डिजिटल करण्यासाठी केंद्र शासनाने विकसित केलेली ‘फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल’ प्रणाली २२ ऑक्टोबरपासून संपूर्ण राज्यात लागू करण्यात येणार आहे.
या प्रणालीमुळे शेतकऱ्यांना संबंधित खत विक्री केंद्रावरील खतांची उपलब्धता आणि साठ्याची माहिती मोबाईलवर मिळणार असून, शेतजमिनीच्या क्षेत्रानुसार खताचे आगाऊ बुकिंग करण्याची सुविधाही उपलब्ध होणार आहे, अशी माहिती पुणे जिल्हा कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.
या प्रणालीसाठी केंद्र शासनाने एफएफएफएस ॲप विकसित केले आहे. शेतकऱ्यांनी हे ॲप मोबाईलमध्ये डाउनलोड केल्यानंतर विविध खत विक्री केंद्रांवरील उपलब्ध खतांची माहिती आणि साठ्याचा तपशील पाहता येणार आहे. त्यामुळे खत खरेदीचे नियोजन करणे अधिक सोयीचे होणार असून, दुकानांबाहेर रांगेत उभे राहण्याची गरज कमी होण्यास मदत होणार आहे.
या ॲपद्वारे खताचे आगाऊ बुकिंग केल्यानंतर संबंधित विक्रेत्याला बुक केलेले खत देणे बंधनकारक राहणार आहे. तसेच खतांची छापील किमतीपेक्षा अधिक दराने विक्री होणे आणि अनुदानित खतांसोबत इतर कृषी निविष्ठा खरेदी करण्याची सक्ती अर्थात ‘लिंकिंग’ यांसारख्या प्रकारांना आळा घालण्यास मदत होणार आहे.
ही प्रणाली सुरुवातीला नाशिक जिल्ह्यात प्रायोगिक तत्त्वावर राबविण्यात आली होती. आता २२ ऑक्टोबरपासून तिची अंमलबजावणी संपूर्ण राज्यात करण्यात येणार आहे. या प्रणालीबाबत पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही तक्रारी, अडचणी किंवा शंका असल्यास त्यांनी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयातील कृषी अधिकारी अथवा पंचायत समिती कार्यालयातील कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे आवाहन पुणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.





