Ujjwal Nikam: केतन अग्रवाल हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
Ujjwal Nikam:

केतन अग्रवाल हत्याप्रकरणी उज्ज्वल निकम विशेष सरकारी वकील
Ujjwal Nikam: देशभरात चर्चेत आलेल्या केतन अग्रवाल खूनप्रकरणी ज्येष्ठ विधिज्ञ उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती झाली आहे. केतनचे वडील विशाल अग्रवाल यांनी निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करून विधी व न्याय विभागाच्या सचिवांना आवश्यक निर्देश दिले होते. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात आली आहे.
व्यावसायिक केतन अग्रवाल याचा १८ जून २०२६ रोजी लोहगड किल्ल्यावरील हत्ती तलावाजवळील दरीत ढकलून खून करण्यात आला. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास पूर्ण करून वडगाव मावळ न्यायालयात पाच हजार ५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
सिया प्रवीण गोयल, चेतन बाबुलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. यामध्ये आरोप निश्चित होऊन खटला लवकर सुरू होणे अपेक्षित आहे. निकम यांची नियुक्ती झाल्याने सरकारी पक्षाची बाजू मांडण्याच्या दृष्टीने या खटल्याला महत्त्व प्राप्त झाले आहे.





