महाराष्ट्र हादरला..! घरात घुसून महिला पोलिसाची हत्या; तर एका नेत्यावर चाकूहल्ला, अमरावतीत तणाव

Asha Ghule Murder Case : अमरावती शहरात दोन धक्कादायक घटनांनी खळबळ उडाली आहे. फ्रेजरपुरा पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या ३८ वर्षीय महिला पोलीस कर्मचारी आशा घुले यांची गुरुकृपा कॉलनीतील त्यांच्या घरी गळा दाबून हत्या करण्यात आली आहे. ही घटना घडल्यानंतर पोलीस महासंचालक (डीसीपी) गणेश शिंदे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले.
आशा घुले यांचे पती राज्य राखीव पोलीस दलात (एसआरपीएफ) कर्मचारी आहेत. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून, पोलिसांनी मृतदेह तपासणीसाठी पाठवला आहे. संशयितांचा शोध घेण्यासाठी तपास तीव्र करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत, युवा स्वाभिमान पार्टीचे पदाधिकारी निलेश भेंडे यांच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांच्या छाती, हात आणि पायावर गंभीर जखमा झाल्या असून, त्यांच्यावर सध्या रेडियंट रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
या दोन्ही घटनांनी अमरावतीत तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस दोन्ही प्रकरणांचा स्वतंत्रपणे तपास करत असून, परिसरात चर्चेचा विषय बनलेल्या या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.





