Federation Cup 2024 : गोल्डन बॉय पुन्हा चमकला, फेडरेशन कपमध्ये नीरज चोप्राला सुवर्णपदक….

Federation Cup 2024 : भुवनेश्वर येथे सुरू असलेल्या फेडरेशन चषकाच्या भालाफेक स्पर्धेचे निकाल आले आहेत. भारताचा स्टार ॲथलीट आणि टोकियो ऑलिम्पिकचा सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा (Neeraj Chopra) यानेही त्यात सहभाग घेतला आणि सुवर्णपदक जिंकले. या स्पर्धेत नीरज व्यतिरिक्त किशोर जेना आणि डीपी मनू यांनीही सहभाग घेतला होता. नीरज आणि जेना आधीच पॅरिस ऑलिम्पिक 2024 साठी पात्र ठरले आहेत आणि त्यामुळे थेट अंतिम फेरीत त्यांना प्रवेश मिळाला होता.
नीरजने 82.27 मीटरच्या सर्वोत्तम थ्रोसह सुवर्णपदक जिंकले. तर, डीपी मनूने 82.06 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नासह दुसरा क्रमांक पटकावला. उत्तम पाटीलने 78.39 मीटरच्या सर्वोत्तम प्रयत्नाने कांस्यपदक जिंकले.
Odisha | Ace javelin thrower Neeraj Chopra wins gold in men’s javelin throw at Federation Cup 2024 with a throw of 82.27m
(file pic) pic.twitter.com/hyrmrdH25r
— ANI (@ANI) May 15, 2024
26 वर्षीय नीरजला करता आली नाही सर्वोत्तम कामगिरी….
26 वर्षीय नीरज दोहा डायमंड लीग खेळल्यानंतर या स्पर्धेत येत आहे. दोहा डायमंड लीगमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर राहिला. तेथे त्याने 88.36 मीटरची सर्वोत्तम थ्रो केला होता. तो झेक प्रजासत्ताकच्या जाकुब वादलेचच्या दोन सेंटीमीटरने पिछाडीवर होता. जाकुबने 88.38 मीटरची सर्वोत्तम थ्रो केला होता.
नीरज व्यतिरिक्त किशोर जेना, डीपी मनू, रोहित कुमार, शिवपाल सिंग, प्रमोद, उत्तम बाळासाहेब पाटील, कुंवर अजयराज सिंग, मनजिंदर सिंग, बिबिन अँटोनी, विकास यादव आणि विवेक कुमार यांनी फेडरेशन कप भालाफेकच्या अंतिम फेरीत भाग घेतला. ही स्पर्धा देखील ऑलिम्पिक पात्रतेचा एक मार्ग होता. पॅरिस ऑलिम्पिकच्या भालाफेक स्पर्धेत नीरज आणि जेना आधीच पात्र ठरले आहेत. उर्वरित खेळाडूंना पात्र होण्यासाठी 85.50 मीटरचे अंतर पार करण्याची मर्यादा होती. मात्र, हे कोणीही करू शकले नाही.
जेन्नाची खराब कामगिरी चिंतेचा विषय…
किशोर जेनाने गेल्या वर्षी आशियाई क्रीडा स्पर्धेत 87.54 मीटर वैयक्तिक सर्वोत्तम कामगिरीसह रौप्य पदक जिंकले होते. मात्र, त्याला 2024 मध्ये आतापर्यंत नऊ प्रयत्नांमध्ये 80 मीटरचे अंतर पार करता आले आहे. ऑलिम्पिकला अवघे काही महिने बाकी असताना ही भारतासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे.





