FDA Maharashtra: एफडीएच्या धाकाने ‘एक्सपायरी’ला लगाम! सणासुदीच्या काळात भेसळयुक्त अन्नाला चाप
FDA Maharashtra: गौरी-गणपती आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर एफडीएची विशेष मोहीम; हॉटेलच्या किचनपासून बेकरी पदार्थांच्या स्वच्छतेवर प्रशासनाची करडी नजर.

FDA Maharashtra – अन्न व औषध प्रशासनाच्या (एफडीए) आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती झाल्यानंतर राज्यातील खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छता, अन्नाची गुणवत्ता आणि नागरिकांच्या आरोग्याबाबत अधिक गांभीर्याने उपाययोजना केल्या जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. हॉटेलमधील स्वयंपाकघराच्या स्वच्छतेपासून ते मिठाईच्या दुकानांमध्ये विक्रीस ठेवण्यात येणाऱ्या पदार्थांवर एक्सपायरी डेट नमूद करण्यापर्यंत अनेक बाबींमध्ये बाजारात बदल जाणवू लागला आहे.
स्वीट मार्टमध्ये मिठाईवर देखील बनविल्याची आणि खाण्यायोग्य कधीपर्यंत राहू शकते, याची तारीख नमूद करणे अनिवार्य आहे. हा नियम बऱ्याच दिवसांपूर्वी लागू झाला होता. परंतु गेल्या काही दिवसांमध्ये यावर व्यावसायिक स्वत: अंमलबजावणी करताना दिसून येत आहेत. सध्या सणा-सुदीचे दिवस असून मोठ्या प्रमाणावर मिठाई खरेदी केली जाते.
अशा परिस्थितीत शुद्ध आणि भेसळमुक्त खाद्य पदार्थ मिळणे खूप गरजेचे आहे. मिठाईच्या दुकानात मिठाई कधी बनविली आहे आणि कधीपर्यंत चांगली राहू शकते, हे कळणे अवघड होत होते. यामुळे एक्सपायरी डेट नमूद करणे अनिवार्य असल्याचा नियम बनविण्यात आला होता. मिठाईच्या दुकानांमध्ये बेस्ट बिफोर तारीख दर्शविण्याबाबत एफएसएसएआयने २०२० मध्येच स्पष्ट निर्देश दिले होते.
१ ऑक्टोबर २०२० पासून खुल्या अथवा पॅकबंद नसलेल्या मिठाईच्या ट्रे किंवा कंटेनरवर बेस्ट बिफोर डेट दर्शविणे बंधनकारक करण्यात आले होते. याकडे अनेक व्यावसायिकांना साफ दुर्लक्ष केले होते. परंतु तुकाराम मुंढे यांनी अन्न व औषध प्रशासन विभागाची कमान सांभाळल्यापासून कारवायांचे सत्र सुरू झाले.
सणासुदीच्या काळात आपल्यावर कारवाई होऊन परवाना निलंबित होऊ नये, या भीतीने अनेक व्यावसायिकांनी आता नियमांचे काटेकोरपणे पालन सुरू केले आहे. काही लहान व्यावसायिक अजूनही या नियमांचे पालन करत नाहीत, अशा व्यावसायिकांवर कारवाईसाठी मोहीम हाती घेण्यात येणार असल्याचे कळते.
हॉटेल, बेकरी, मिठाईची दुकाने आणि इतर खाद्य आस्थापनांमध्ये स्वच्छता राखण्यासोबतच खाद्य पदार्थांची योग्य पद्धतीने साठवणूक, पदार्थांच्या गुणवत्तेची तपासणी तसेच कालबाह्य खाद्य पदार्थांची विक्री होणार नाही, याची दक्षता घेतली जात असल्याचे चित्र बाजाराचे दिसत आहे.
सणा-सुदीच्या काळात विभाग अधिक सर्तक
येत्या काळात गौरी-गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी यांसारख्या सणांची रेलचेल सुरू होणार आहे. या काळात मिठाई, फराळ, बेकरी पदार्थ तसेच विविध खाद्य पदार्थांची मागणी मोठ्या प्रमाणात वाढते. त्यामुळे सणासुदीच्या काळात भेसळयुक्त, निकृष्ट किंवा कालबाह्य खाद्य पदार्थांची विक्री होऊ नये, यासाठी अन्न व औषध प्रशासनाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.






