FDA Raid Mumbai : मुंबईत तुकाराम मुंढेंचा मोठा दणका; इस्कॉनच्या खाद्य आस्थापनांवर कारवाई, IRCTC विक्रेत्याचाही परवाना निलंबित
FDA Raid Mumbai : मुंबईत FDAची मोठी कारवाई. जुहू इस्कॉनच्या तीन खाद्य आस्थापनांसह कुर्ल्यातील IRCTC विक्रेत्याचा परवाना स्वच्छता व अन्न सुरक्षा नियमांच्या उल्लंघनामुळे निलंबित.

FDA Raid Mumbai : महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (FDA) अन्नपदार्थांच्या स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांविरोधात कारवाईचा धडाका सुरू केला आहे. कुर्ला पश्चिम येथील IRCTCशी संबंधित पुरवठादार आर. के. असोसिएट्स अँड हॉटेलियर्सचा अन्न परवाना तसेच जुहू येथील इस्कॉन (ISKCON) मधील तीन अन्न आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत. (FDA Raid Mumbai)
२ सप्टेंबर रोजी केलेल्या तपासणीत आर. के. असोसिएट्सच्या साठवणूक व प्रक्रिया विभागात झुरळे आढळली. अन्न उघडे ठेवणे, उघड्या कचऱ्याजवळ अन्न तयार करणे, फरशा खराब असणे आणि भिंतींना तडे व नुकसान झाल्याचे आढळले. कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक स्वच्छतेतही त्रुटी होत्या. जखमी बोट असलेला कर्मचारी अन्न हाताळत असल्याचे आढळले, तर ३४ पैकी केवळ २१ कर्मचाऱ्यांकडे वैद्यकीय तंदुरुस्ती प्रमाणपत्र होते.
इस्कॉनच्या फूड आउटलेट्सवर कारवाई – (FDA Raid Mumbai)
३ सप्टेंबर रोजी जुहू येथील इस्कॉनच्या तीन अन्न आस्थापनांची तपासणी करण्यात आली. त्यात पाण्याच्या नियमित तपासणीच्या नोंदी नसणे, कच्च्या मालाची योग्य तपासणी न करणे, अन्न साठवणुकीसाठी तापमान व आर्द्रतेचे योग्य नियंत्रण नसणे, स्वच्छतेचा अभाव आणि कीटकांचा धोका अशा त्रुटी आढळल्या.
इस्कॉनच्या फूड सर्व्हिसेस रेस्टॉरंटच्या मागील बाजूचा स्वयंपाकघराचा प्रवेश खुला होता. त्यामुळे कीटकांचा प्रवेश रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना नसल्याचे आढळले. तसेच नाल्यांमध्ये अन्नकचरा व कीटकांची विष्ठा आढळली. कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय तपासणी, लसीकरण आणि प्रशिक्षणाच्या नोंदींतही त्रुटी होत्या.
इस्कॉन गोविंदास रेस्टॉरंटमध्येही अन्न व पाण्याची तपासणी, कच्च्या मालाची हाताळणी, स्वच्छता, ड्रेनेज, कीटक नियंत्रण, उपकरणांचे कॅलिब्रेशन आणि कर्मचाऱ्यांच्या स्वच्छतेसंदर्भात नियमांचे उल्लंघन आढळले. या आस्थापनाचा परवाना ७ सप्टेंबरपासून तत्काळ निलंबित करण्यात आला.
मुंबईतील बॉम्बे – द फूड फ्युजन कॅफे, श्री मधुरम, कोठारी स्वीट आणि मुलुंड फरसाण मार्ट तसेच महाराष्ट्र बिर्याणी सेंटरविरोधातही कारवाई करण्यात आली आहे. यापैकी काही ठिकाणी परवाना निलंबित करण्याची शिफारस करण्यात आली आहे. ( FDA Raid Mumbai)
नवी मुंबईतील खारघर येथील मातेश्वरी दूधचा अन्न व्यवसाय परवानाही निलंबित करण्यात आला. या संस्थेकडे दूध पाश्चरायझेशनची यंत्रणा नसतानाही पाश्चराइज्ड दूध विकल्याचा आरोप आहे. तसेच टोंड दूध गायीचे, तर स्टँडर्डाइज्ड दूध म्हशीचे दूध असल्याचे भासवून विकले जात असल्याचे FDAने म्हटले आहे.
FDA आयुक्तपदाची जबाबदारी तुकाराम मुंढे यांनी मे महिन्यात स्वीकारल्यानंतर राज्यभर अन्न स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कारवाई तीव्र करण्यात आली आहे.





