FDA Action: ’फाउंटन प्युअर व्हेज’चा परवाना निलंबित! पण शेजारच्या शाखेतून सेवा सुरूच? प्रवाशांमध्ये संभ्रम
FDA Action: प्रवाशांच्या आरोग्याशी खेळ सहन करणार नाही; एफडीएच्या अचानक केलेल्या पाहणीत उघड झाल्या गंभीर त्रुटी.

FDA Action – पुणे-नाशिक महामार्गावरील आळेफाटा येथील प्रवाशांचा प्रमुख आधार आणि एसटी महामंडळाचा अधिकृत थांबा असलेल्या प्रसिद्ध ’फाउंटन प्युअर व्हेज’ हॉटेलचा अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) परवाना तातडीने निलंबित केला आहे. किचनमधील गंभीर अस्वच्छता, अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन आणि कर्मचार्यांच्या सुरक्षेबाबतच्या त्रुटी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली.
एफडीएच्या अधिकार्यांनी 22 जुलै रोजी अचानक तपासणी केली असता, किचनमध्ये मोठ्या प्रमाणात अस्वच्छता, खिडक्यांना संरक्षणात्मक जाळ्या नसल्याने माशांचा प्रादुर्भाव तसेच अन्न सुरक्षा व स्वच्छतेच्या नियमांकडे दुर्लक्ष झाल्याचे निदर्शनास आले. या निष्कर्षांच्या आधारे हॉटेलचा परवाना निलंबित करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, मुख्य हॉटेलवरील कारवाईनंतर व्यवस्थापनाने शेजारील ’फाउंटन फूड अँड फन’ या शाखेत किचन आणि कर्मचारी स्थलांतरित करून तेथूनच सेवा सुरू ठेवल्याची माहिती समोर आली आहे. मुख्य हॉटेल बंद असतानाही एसटी महामंडळाच्या बसेस या शाखेत थांबत असल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण असून, अन्न सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
एफडीएच्या या कारवाईमुळे महामार्गावरील हॉटेलांमध्ये अन्न सुरक्षा आणि स्वच्छतेच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. प्रवाशांच्या आरोग्याशी संबंधित बाबींमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
सर्व निकष पूर्ण करणार
हॉटेल व्यवस्थापनाने एफडीएने निदर्शनास आणून दिलेल्या सर्व त्रुटी मान्य केल्या असून, मुख्य हॉटेलमध्ये नूतनीकरण आणि आवश्यक दुरुस्तीचे काम सुरू असल्याचे सांगितले आहे. अन्न सुरक्षा नियमांनुसार आवश्यक सर्व निकष पूर्ण झाल्यानंतरच मुख्य हॉटेल पुन्हा सुरू करण्यात येईल, असे व्यवस्थापक सुरेश कासार यांनी सांगितले.





