FC Road Traffic : पार्किंगच्या जागा गिळंकृत! फर्गसन रोडवरील अतिक्रमणांवर प्रशासन ‘बघ्याची’ भूमिकेत
FC Road Traffic : फर्गसन रोडवरील कोंडीचा फटका भांडारकर, कर्वे आणि जेएम रोडला; ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करत असल्याने कोंडीत भर.

FC Road Traffic – शहरातील अत्यंत वर्दळीच्या नामदार गोखले रस्त्यावर (फर्गसन रस्ता) अतिक्रमण हटविण्याच्या नावाखाली प्रशासनाकडून मोठा गाजावाजा करण्यात आला. पोलीस आयुक्त आणि महापालिका आयुक्तांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन कठोर कारवाईचे आश्वासन दिले. मात्र, प्रत्यक्षात पदपथांवरील काही हातगाड्या हटवून प्रशासनाने केवळ दिखाऊ कारवाई केली आहे.
इमारतींच्या पार्किंग, फ्रंट आणि साइड मार्जिनमध्ये अनधिकृत बांंधकामे करून त्या ठिकाणी विनासायास व्यवसाय केले जात आहेत. याचा ताण मुख्य रस्त्यावरील वाहतुकीवर येत आहे. या कोंडीचा फटका या रस्त्याला जोडणाऱ्या प्रभाग रस्ता, भांडारकर रस्ता, कर्वे रस्ता, माॅडेल काॅलनी रस्ता, आपटे रस्ता, तसेच जंगली महाराज रस्त्यावर येत असतानाही त्याकडे नेमके कोण आणि कशासाठी दुर्लक्ष करत आहे,
तसेच या व्यावसायिकांवर नेमकी कोणाची मेहेरबानी आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. केवळ याच रस्त्यावर नाही, तर लक्ष्मी रस्ता, कर्वे रस्ता, शिवाजी रस्ता, बाजीराव रस्ता, स्वारगेट, सिंहगड रस्ता, नवा पूल आणि जुना बाजार परिसरातही अतिक्रमणांचा विळखा वाढतच चालला आहे. शनिवार- रविवार आणि सुट्ट्यांच्या दिवशी पदपथ पूर्णपणे व्यापले जात असल्याने नागरिकांना रस्त्यावरून चालावे लागत आहे. अनेक ठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिक आणि विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून वाहतुकीतून मार्ग काढावा लागत आहे.
साइड मार्जिन केले गिळंकृत
अनेक इमारतींतील साइड मार्जिंन, तसेच फ्रंट मार्जिंग वाहनांच्या पार्किंगसाठी रिकामे ठेवणे अपेक्षित असताना या जागा व्यावसायिकांना भाडेकराराने देण्यात आल्या आहेत, तर इमारतींच्या पार्किंग जागा सर्रास दुकानांमध्ये, गोदामांमध्ये आणि खाद्यव्यवसायांसाठी वापरल्या जात आहेत. परिणामी वाहनांसाठी असलेली जागा व्यापली जात असून, खरेदीसाठी आलेले ग्राहक रस्त्यावरच वाहने पार्क करत आहेत. त्यामुळे मुख्य रस्त्यावर वाहतूक कोंडी होत असून, पादचाऱ्यांची गैरसोय आणि सुरक्षेचे प्रश्न गंभीर होत असतानाही प्रशासन मात्र बघ्याची भूमिका घेत असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहेत.




