पुणे | फादर्स डे च्या दिवशीच मुलीचे कलेवर पाहण्याची दुर्दैवी वेळ

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – संगणक क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेऊन, चांगल्या पदावर नोकरी मिळणार आणि त्या माध्यमातून स्वत:बरोबरच कुटुंबाचेही कल्याण, प्रगती होणार असे स्वप्न बाळगून निर्मिती शिंदे ही २६ वर्षीय तरुणी जर्मनीमध्ये गेली.
मात्र ताप आल्याचे निमित्त झाले आणि मेंदूतील रक्तस्त्रावाने तिचा जर्मनीतच मृत्यू झाला. तीनच महिन्यात तिच्यावर काळाने घातला आणि तिचे कलेवर पाहण्याची वेळ ‘फादर्स डे’च्या दिवशी बापावर आली.
निर्मितीच्या आईचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. निर्मितीने कोल्हापूरातील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण करत तिने आईची शुश्रुषा केली. मात्र दुर्दैवाने तिच्या आईचा मृत्यू झाला. परंतु ॲकॅडमीक मध्ये गती असल्याने निर्मितीने पुढे भारती विद्यापीठात संगणक क्षेत्रातील पदवी मिळवली आणि पदव्युत्तर शिक्षणासाठी तिने जर्मनीमधील एका विद्यापीठात प्रवेश मिळवला.
वडिलांना या क्षेत्रातील काहीच माहिती नव्हती, परंतु तिने स्वत:च सगळे प्रयत्न करून जर्मनीत प्रवेश मिळवला आणि याच वर्षी २० एप्रिल रोजी ती जर्मनीत विद्यापीठात रुजूही झाली.
तिचे वडील सुरेश शिंदे हे दै. प्रभात मध्ये मुद्रीत शोधक म्हणून कार्यरत आहेत. जर्मनीत जाण्यासाठी तिला दिशा परिवारने आर्थिक मदत केली होती. तिला ताप आल्याचे निमित्त झाले आणि तो मेंदूपर्यंत गेला. ब्रेनस्ट्रोक होऊन मेंदूत रक्तस्त्राव झाला आणि ११ जून रोजी तिचा मृत्यू झाला.
जर्मनीतून भारतात तिचे पार्थिव आणण्यासाठी अनेक सरकारी सोपस्कार पूर्ण करावे लागतात. विमानतळही कधी न पाहिलेल्या सुरेश शिंदे यांना मुलीचे पार्थिव भारतात कसे आणता येईल, आपल्याला तिला शेवटचे पाहता येईल की नाही याची तळमळ वाटू लागली.
दै. प्रभात मधील कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेऊन तसेच जर्मनीत शिक्षण घेणाऱ्या तेजस पाटील या विद्यार्थ्याने जर्मनीत मदत केली. पुण्याचे नवनिर्वाचित खासदार आणि केंद्रीय नागरी हवाई उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी तातडीने जर्मन दूतावासाशी संपर्क करून तिचे पार्थिव पुण्यात आणण्यासाठी मोलाची मदत केली.
सगळे सोपस्कार पूर्ण करून रविवारी (दि. १६) सायंकाळी तेजस याने निर्मितीचे पार्थिव भारतात आणले. त्यानंतर कोल्हापूर या तिच्या गावी शोकाकूल वातावरणात तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.




